लोणी काळभोर : स्वामी शिक्षण संस्थेच्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये मागील १५ वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करीत असलेले शिक्षक सोमनाथ दळवी यांची कन्या श्रद्धा दळवी हिने एकाच वर्षात सैनिकी व नवोदयची परीक्षा उत्तीर्ण होणाचा पराक्रम केला आहे.
नवोदय विद्यालय समितीने जवाहर नवोदय विद्यालयाच्या 2023 च्या परीक्षेचा इयत्ता ६ वीच्या प्रवेशासाठीचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत श्रद्धा दळवी हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. श्रद्धाने मिळविलेल्या यशाबद्दल परिसरातील नागरिकांकडून तिचे भरभरून कौतुक होत आहे.
श्रद्धाचे आई-वडील हे दोघेही शिक्षक आहेत. श्रद्धाची आई नांनगाव (ता.दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षका आहेत. या शाळेतच श्रद्धा आणि तिचा लहान भाऊ राजवीर हे दोघेही शिक्षण घेत आहेत. दळवी कुटुंब हे मूळचे बारलोणी (ता.माढा जि. सोलापूर) येथील आहे. मात्र नोकरी निमित्ताने ते केडगाव या ठिकाणी वास्तव्यास आहे. घरी शैक्षणिक वातावरण असल्याने श्रद्धाला अभ्यासाची आवड आहे.
श्रद्धा 4 वर्षांची असतानाच तिने 15 ऑगस्ट रोजी स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर केला होता. तर दुसरीत असतानाच तिला राज्यस्तरीय ” जागतिक हात धुणे” या स्पर्धेत पहिले प्रथम पारितोषिक मिळाले. येथूनच तीने सुवर्ण पदक व ट्रॉफी जिंकण्यास सुरुवात केली. तिने कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. तिने आजतागायत 14 ट्रॉफी व अनेक गोल्ड मेडल जिंकले आहेत. तसेच तिने वक्तृत्व स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर तिचा छोटा भाऊ राजवीर दळवी यानेही स्केटिंग मध्ये जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
श्रद्धा आता नांनगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. पाचवीत प्रवेश घेतल्यानंतर श्रद्धाने सैनिकी स्कूल व नवोदय विद्यालय या दोन परीक्षेचा अभ्यास सुरु केला. त्यानंतर श्रद्धाने खूप सराव केला. श्रद्धाने सैनिकी स्कूल या परीक्षेमध्ये 300 पैकी 254 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच ती जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा देखील उत्तीर्ण झाली आहे. श्रद्धाने मिळविलेल्या या दुहेरी यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, केंद्रीय पाठ्यक्रम अंतर्गत केंद्र सरकारने सुरू केलेल्या जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेशासाठी राज्य स्तरावर परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश दिला जातो. तर सैनिक स्कूल ही भारतातील सर्वोत्तम शाळांमध्ये गणली जाते. यामध्ये प्रवेश घेणे सोपे नाही. सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी कठीण प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
मिळालेल्या यशानंतर बोलताना श्रद्धा म्हणाली की, एकाच वेळी दोन्ही अवघड परीक्षा पास झाल्याने मला खूप आनंद झाला आहे. नातेवाईक फोन करून अभिनंदन करीत असल्यामुळे खूप उत्साह वाढला आहे. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मला आई-वडील व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे मी त्या सर्व मार्गदर्शकांचे आभार मानते.