युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात पशुधन जगविताना पशुपालक व शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे ओला चारा कमी झाला आहे. धरणांमधून पाणी सुटले आहे; परंतु ते पिकांपर्यंत पोहोचण्यास अवकाश आहे. तोपर्यंत चारा टिकवणे मुश्किल झाले आहे. परिणामी चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दुधाचे उतरलेले भाव, पशुखाद्याची भाववाढ, ओला-सुका चारा मिळण्यास अडचण यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारीच्या कडब्याला उन्हाळ्यात जास्त मागणी असते. ऊस कारखानदारी सुरू असेपर्यंत जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाच्या वाढ्याचा उपयोग शेतकरी करतात. ऊसाच्या वाढ्याला शेकडा २५० रुपये दर आहे. हा दर शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मात्र, पशुधन वाचविण्यासाठी पशुपालक तडजोड करताना दिसत आहेत. दुधाच्या दरात मोठी घसरण झाल्याने दुग्ध व्यवसाय संकटात आला आहे.
सध्या ऊसाचा हंगाम संपत आला असून, ऊस जळीताचे प्रकार वाढत आहेत. अनेक कारणांमुळे उसाच्या वाढ्याचे प्रमाण कमी झाले आहे. जनावरांसाठी चारा पीक म्हणून उपयोगी पडणारे हत्ती गवत, नेपेरीआ, मुरघास, घास यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे कडब्याला मागणी वाढली आहे. पठार भागातील अनेक कडबा व्यावसायिक तसेच शेतकरी आपल्याजवळील कडबा या भागात आणताना दिसत आहेत. सध्या कडब्याला शेकडा २५०० ते ३५०० रुपये भाव मिळत आहे.
दुग्ध उत्पादनात मोठी उलाढाल होत असते. डेअरी उद्योगांमुळे दूध पूरक उद्योग वाढीस लागले आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने ज्वारीचे उत्पादन कमी झाले. कडब्याच्या कमतरतेमुळे त्यांचे भाव वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे, असे शेतकरी पांडुरंग भोर यांनी सांगितले.
शासनाने दूध व्यावसायिकांना मदतीचा हात द्यावा
दुधाचे दर वाढले की ग्राहकाकडून तक्रार केली जाते. मात्र, पशुखाद्याचे दरही दुधाच्या दरवाढीपेक्षा अधिक पटीने वाढले आहेत. ओला आणि सुका चारा महागला आहे. त्यामुळे लिटर मागे दूध उत्पादन खर्च वाढला आहे. शासनाने दूध व्यवसायिकांना मदतीचा हात दिला पाहिजे.
– राजेश सांडभोर, दुग्ध व्यावसायिक