पुणे (Pune): सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका सराफी पेढीवर खेळण्यातील पिस्तुलाच्या धाकाने दरोडा टाकून दागिने लुट प्रकरणाला वेगळे वळण लागले असून याप्रकरणी गुन्हे शाखेने दोन जणांना अटक केली आहे. चौकशीत सराफी पेढीचा मालक कर्जबाजारी झाल्याने देणेकऱ्याचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्याने चुलतभावाच्या मदतीने सराफी पेढीवर दरोडा टाकण्याचा बनाव रचल्याचे उघडकीस आले आहे.
धायरीतील काळूबाई चौक परिसरातील श्री ज्वेलर्स सराफी पेढीवर गेल्या मंगळवारी (दि. १५) भरदिवसा दरोडा पडल्याने खळबळ उडाली होती. सराफी पेढीचा मालक आणि कर्मचाऱ्याला खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून २२ तोळ्यांचे दागिने लुटून चोर पसार झाले होते. सराफी पेढीतील कर्मचाऱ्याने चोरट्यांना प्रतिकार केला. झटापटीत चोरट्यांकडील पिस्तूल सराफी पेढीत पडले. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिस्तूल ताब्यात घेण्यात आले.. तेव्हा ते खेळण्यातील असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर, गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करुन दरोडा टाकणाऱ्या दोन जणांना अटक केली.
पोलिसांनी आरोपींची चौकशी केल्यावर सराफी पेढी मालकाच्या चुलत भावाने सराफी पेढीवर दरोडा टाकण्यास सांगितल्याची माहिती उघडकीस आली. सराफी पेढीच्या मालकावर २० ते २५ लाख रुपयांचे कर्ज होते. तसेच, त्याने काहीजणांकडून उसने पैसे घेतले होते. देणेकऱ्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी सराफी पेढीच्या मालकाने चुलतभावाच्या मदतीने दरोड्याचा बनाव रचल्याचे तपासात उघडकीस आले. सराफी पेढीत दरोडा टाकल्यानंतर चोरटे दुचाकीवरुन पसार झाले होते. दरोड्यासाठी वापरलेली दुचाकी चोरीची असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.