पुणे : लोणावळ्यातील नामांकित महाविद्यालयात बीबीए. सीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या १९ वर्षीय दिव्यांग विद्यार्थिनीला रॅगिंग सहन न झाल्याने ब्रेन स्ट्रोक आल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात तिच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी लोणावळा ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी लोणावळ्यातील नामांकित महाविद्यालयात बीबीए. सीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. ती दिव्यांग आहे. इतर तीन मुलींसह ती लोणावळ्यात एका वसतिगृहामध्ये राहते. वसतीगृहातील खोलीत तिच्यासोबत राहणाऱ्या तीन मुली तिला खूप त्रास देत होत्या. वेळोवेळी बाथरूमध्ये कोंडून ठेवणे, पाठीमागे चाकू घेऊन धावणे, दिव्यांगावरून टोमणे मारणे, असे प्रकार सातत्याने घडत होते. अनेकदा पीडितेला चाकू लागल्याची नोंद पोलीस तक्रारीत केली आहे. हा प्रकार दोन-तीन महिन्यांपासून सुरू होता.
दरम्यान, या प्रकाराची माहिती पीडितेने आपल्या वडिलांना दिली होती. त्यानंतर संतप्त झालेल्या पीडितेच्या पालकांनी एका मुलीच्या घरी फोन करून तुमची मुलगी माझ्या मुलीची रॅगिंग करत असल्याबाबत सांगितले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी ‘मी फौजी आहे. तक्रार करू नका’, असे म्हणत पीडितेच्या वडिलांना धमकावले.
महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिकांकडे पीडित मुलीने तिन्ही मुलींची तक्रार केली. पण, उलट त्या मुलींचे करिअर खराब होईल, असे सांगण्यात आले. अखेर न्याय न मिळाल्याने त्रस्त झालेल्या मुलीची कुचंबणा झाली. तिला मानसिक त्रास असह्य झाला. अखेर १२ मार्च रोजी पीडितेला रात्री अकराच्या सुमारास ब्रेन स्ट्रोक आला, असा आरोप पीडितेच्या पालकांनी केला आहे.
वसतिगृहातील तिन्ही मुलींवर रॅगिंग केल्याप्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित मुलीच्या पालकांनी केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस तक्रार करूनही न्याय देत नसल्याचा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे.