पुणे : पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने तिघांवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना घोरपडी येथील बी टी कवडे रस्त्यावरील देवकी पॅलेस चौकातील स्वराज अमृततुल्य शेजारी गुरुवारी (ता.21) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी एका 28 वर्षाच्या तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांच्या विरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी फिर्यादी व आरोपींमध्ये शाब्दिक वाद व बाचाबाची झाली होती. त्यामुळे आरोपी फिर्यादी व त्यांच्या मित्रांचा राग मनात धरून मारण्याचा डाव रचत होते. दरम्यान, विधानसभा निवडणूकीची मतदान प्रक्रिया बुधवारी (ता.20) संपली आहे. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे तीन मित्र गुरुवारी (ता.21) पहाटेपर्यंत गप्पा मारत बसले होते. हे आरोपींनी पाहिल्यानंतर आरोपी स्वराज अमृततुल्य शेजारी आले. आरोपींनी अमित परदेशी याच्या डोक्यात व हनुवटीवर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी यांना हाताने व उलट्या कोयत्याने मारहाण केली. सोहेश अलमले (रा. मांजरी) याच्या कानाजवळ धारदार हत्याराने वार करुन जखमी केले.
त्यानंतर आरोपींनी अजय पवार याच्या डोक्यात मानेवर पाठीमध्ये पोटावर, दोन्ही पायावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी तेथील स्वीफ्ट कारची मागील काच फोडून पळून गेले. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे तपास करीत आहेत.