वाघोली : वाघोलीमधून फसवणुकीची बातमी समोर आली आहे. शेअर मार्केटमधून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची ४९ लाख ३६ हजार ९१३ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहेव. याप्रकरणी वाघोलीत राहणाऱ्या ४६ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध फसवणूकीसह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना संपर्क करुन वेगवेगळ्या लिंकवर खाते तयार करायला लावले. तसेच शेअर मार्केटमध्ये चांगला फायदा होईल असे सांगून गुंतवणूक करायला लावली. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी काही रक्कम त्यांच्या खात्यावर पाठविली. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून पैसे पाठवायला लावून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.