दौंड : यवत (ता. दौंड) येथील शेतजमीनीचा बिनताबा साठेखत करण्यासाठी दौंड येथील दुय्यम सहाय्यक निबंधक कार्यालयात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाचे बनावट झोन प्रमाणपत्र सादर करून सरकारची दिशाफूल आणि फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी यवत येथील एका नामांकित दैनिकाच्या पत्रकारासह दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संभाजी दत्तात्रय ताकवणे (रा. पारगाव, ता. दौंड, जि. पुणे), संदीप सुर्यकांत चाफेकर (रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) व संजय मारूती दोरगे (रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील यवत येथील गट नं ८३६ या मिळकती बाबत बिनताबा साठेखत दस्त क्र. २६९५/२०२० व २६९७/२०२० ही दोन दस्त नोंदविली गेली होती. त्यावेळेस दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार एस. एस. वाव्हळ यांच्याकडे होता. त्यांनी सदर दस्ताची नोंदणी केलेली आहे. यवत येथील गट नं ८३६ या सी क्षेत्र ०० हे ३९ आर यांना आकार ०० रु ८७ पै यापैकी ०० हे १२ आर या मिळकतीबाबत श्री संभाजी दत्तात्रय ताकवणे यांनी संजय मारूती दोरगे तर्फे अ.पा.क वडील मारूती दोरगे यांचेकडून बिनताबा साठेखत अशा शिर्षकाचा दस्त दिनांक ९ ऑक्टोबर २०२० रोजी लिहून घेतला.
पुणे ग्रामीण सहजिल्हा निबंधक वर्ग १ राजेंद्र शंकर ढमढेरे (रा नारायणबाग हाऊसिंग सोसायटी हडपसर पुणे) यांनी या मुळ दस्ताबाबत तक्रार अर्जाच्या अनुषंगाने केलेल्या चौकशीत दोन्ही दस्तामध्ये जोडले गेलेले झोन प्रमाणपत्र हे बनावट असून (संदर्भ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांनी दिलेले पत्र जा क्र पीएमआरडीए/झोन दाखला/पुणे/८६१/दिनांक १५/७/२०२१) झोन प्रमाणपत्र हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांनी दिलेले नाही.
दरम्यान, या दस्तातील पक्षकार संभाजी दत्तात्रय ताकवणे, संदीप सुर्यकांत चाफेकर व संजय मारूती दोरगे यांनी बनवल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांनी बनावट कागदपत्रे लावून सरकारची फसवणूक केली.
याबाबत दौंड दुय्यम निंबधक कार्यालयाचे अधिकारी अरुण नामदेव आवाड यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील संदीप चाफेकर हा एका नामांकित दैनिकाचा पत्रकार असल्याची माहिती मिळत आहे.