पुणे :‘साली आधी घरवाली…’ असे म्हणत दाजीनेच अल्पवयीन मेहुणीसोबत गैरवर्तन करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वडगाव बुद्रुक येथे घडली आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
आरोपीच्या राहत्या घरात हा प्रकार नोव्हेंबर २०२३ ते २५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडला. याबाबत १४ वर्षीय पीडित मुलीच्या आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बुधवारी (ता. २८) फिर्याद दिली आहे. यावरुन पीडित मुलीचा दाजी सुरेश शामलाल यादव (वय-२६, रा. चरवडवस्ती, वडगाव बु. पुणे) याच्यावर पोक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १४ वर्षीय मुलगी आरोपीच्या घरी असताना तिच्या बहिणीच्या पतीने वेळोवेळी तिच्यासोबत अश्लील चाळे करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. सातत्याने हे कृत्य होत असल्याने संतप्त झालेल्या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, आरोपीला ही बाब कळताच त्याने तिला मारहाण करुन कोणाला काही सांगितले तर तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार नाही, असे सांगत धमकावले. तसेच तुझे आई-वडील व मोठी बहिण गावाला गेल्यानंतर बघून घेतो, अशी धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मालुसरे करीत आहेत.