पुणे : कुख्यात गुंड शरद माेहोळचा खुनाचा कट मुख्य सूत्रधार साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने रचला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून तो मोहोळचा खून करण्याची संधी शोधत होता. मोहोळचा खून करण्यासाठी रचलेल्या कटात सामील होण्यास नकार दिल्याने पोळेकरने भूगाव परिसरात पिस्तुलातून एकावर गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर एका डाॅक्टरने उपचार केले, परंतु पोलिसांना याबाबतची माहिती दिली नाही. जर तेव्हा पोळेकरने केलेल्या गोळीबाराचा प्रकार उघडकीस आला असता तर माेहोळ वाचला असता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद मोहोळचा खून करण्यासाठी मुन्ना पोळेकरने एका तरुणाला कटात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली होती. मात्र, तरुणाने याला नकार दिल्यानंतर मुन्ना पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरूड) आणि त्याचा साथीदार नामदेव कानगुडे ऊर्फ मामा (वय ३५, रा. भुगाव) यांनी त्याच्या पायावर गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे. बंडगार्डन पोलिसांकडून हा गुन्हा पौड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
१७ डिसेंबर २०२३ रोजी रात्री साडेअकरा वाजता भुगाव येथील सिताई लेकच्या पार्किंगमध्ये चारचाकीमध्ये आरोपी मुन्ना याने अजय सुतार याला सांगितले की, शरद मोहोळ याला ठार मारण्याचा आमचा प्लॅन आहे, तो साध्य करण्यासाठी आमहाला तू सहकार्य करावे. मात्र, अजयने याला नकार दिल्याने मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनी रागाच्या भरात अजयला ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टल बाहेर काढले असता अजय गाडीतून उतरून पळून जाऊ लागला, याचवेळी मुन्ना पोळेकर याने पिस्टलमधून दोन गोळ्या झाडल्या. यात अजय गंभीर जखमी झाला. या प्रकाराबाबत कोणालाही काही सांगायाचे नाही म्हणून अजयला जिवे मारण्याची धमकी दिली.
अजयला गोळी लागल्यानंतर ती काढण्यासाठी अजयला दवाखान्यात दाखल करण्यात आले. अजय किंवा संबंधित डॉक्टरने घडलेली घटना पोलिसांना कळविणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. ही घटना वेळेत कळवली असती, तर कदाचित मोहोळ याचा जीव वाचला असता. घटनेचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण करीत आहेत.