पिंपरी चिंचवड : तळेगाव स्टेशन चौक परिसरात एक धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. प्रवासी महिला आणि पीएमपी बसचालक व वाहकामध्ये तिकीटासाठी सुट्टे पैसे नसल्याने बाचाबाची झाली. त्यानंतर चालक आणि वाहकाने मिळून बसमधील सर्व प्रवाशांना उतरवून संबंधित महिलेला जबरदस्तीने डेपोमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, प्रसंगावधान राखून संबंधित महिलेने नातेवाईकांना तत्काळ फोन केला. यामुळे महिलेची सुटका झाली. याप्रकरणी बसचालक आणि वाहक या दोघांवर विनयभंग आणि प्रवासी महिलेचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
ही घटना रविवारी (ता. २८) तळेगाव स्टेशन चौक परिसरात घडली. याप्रकरणी बसचालक नवनाथ व्यंकटराव ढगे (वय २८, रा. मोईगाव), वाहनचालक मुजा गणपती लुट्टे (वय ३०, रा. रूपीनगर, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी २९ वर्षीय महिलेने तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी माहिती दिली. पीडित महिला या तळेगाव स्टेशनपासून निगडीकडे जाणार्या बसमध्ये बसल्या होत्या. ही महिला आणि वाहक यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर चालकाने महिलेचे मोबाईलमध्ये शुटींग सुरू केले. तेव्हा माझे शुटींग का करतो असे विचारत ही महिला चालकाच्या अंगावर धावून गेली आणि त्यांच्या हातातील मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालकाने महिलेचा विनयभंग केला. तसेच, चालक आणि वाहक या दोघांनी बसमधील इतर प्रवाशांना खाली उतरवले. संबंधित महिलेला जबरदस्तीने बसमध्येच थांबवून ठेवत बस थेट डेपोकडे नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा घाबरलेल्या महिलेने नातेवाईकांना फोन करून सगळी माहिती दिली.
दरम्यान, महिलेच्या नातेवाईकांनी बसचा पाठलाग करीत, बस अडवली. भररस्त्यात महिलेच्या नातेवाईकांनी बस अडवून संबंधीत महिलेची सुटका केली. या सगळ्या प्रकारानंतर भेदरलेल्या महिलेने सोमवारी (२९ जानेवारी) पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून, चालक आणि वाहकाला अटक केली आहे.