पुणे : जागेचा वाद इतका विकोपाला गेला की त्या वादामधून एका कुटुंबाच्या घरात घुसत त्यांना मारहाण करून त्यांच्या घरातील साहित्य बाहेर फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना वाघोली येथील ढोले पाटील महाविद्यालय रस्त्यावर घडली आहे. तसेच या कुटुंबाचे घर जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले आहे. तर, या कुटुंबातील मुलीचा विनयभंग देखील करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवार, २८ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. दीपीन घोरपडे (वय ४५), बांधकाम व्यवसायिक अमित अशोक चंदवाणी (वय ३५) यांच्यासह अनोळखी आठ ते दहा महिला व पुरुषांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
लोणीकंद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या वाघोली येथील चोखी ढाणी शेजारी असलेल्या ढोले पाटील कॉलेज रस्त्यावरील प्लॉट नंबर १२४ वर राहतात. बुधवारी त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्या घरीच झोपलेल्या होत्या. दुपारच्या वेळेत आरोपी दीपीन घोरपडे त्यांच्या घरामध्ये आला. त्याने फिर्यादी व त्यांच्या मुलीला ‘तुम्ही घराच्या बाहेर निघा. मी बिपीन घोरपडे आहे. मी अमित अशोक चंदवाबी साहेबांचा माणूस आहे. मला चंदवानी साहेबांनी पाठवले आहे. ही जागा चंदवानी साहेबांची आहे.’ असे म्हणत त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी महिलेने ही जागा आमचीच असल्याचे सांगितले. त्यावेळी फिर्यादी आणि त्यांच्या मुलीला घराच्या बाहेर काढण्याचा आरोपीने प्रयत्न केला.
फिर्यादीच्या मुलीला पाठीमागे कंबरेला धरून तिचा हात पिरघळण्यात आला. तिला जखमी करून तिचा विनयभंग देखील करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या गदारोळात देखील फिर्यादी महिला घराबाहेर जात नसल्याने त्यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यात आली. तसेच, त्यांचे डोके भिंतीला आदळून खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपी घोरपडे याने कोणालातरी फोन केला आणि जेसीबी सह आठ ते दहा महिला व पुरुषांना त्या ठिकाणी बोलावून घेतले.
तुम्ही येथे परत दिसला तर तुम्हाला जीवे ठार मारू..
या सर्वांनी देखील फिर्यादी महिलेला मारहाण केली. तसेच, त्यांच्या घरातील सामान बाहेर काढून ‘तुम्ही येथे परत दिसला तर तुम्हाला जीवे ठार मारून टाकेल’ अशी धमकी दिली. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने फिर्यादी महिलेचे घर पाडून नुकसान केले. यासोबतच फिर्यादीच्या घरातील काही पैसे, गॅस शेगडी, सिलेंडर, एलईडी टीव्ही अशा वस्तू घोरपडे याने चोरून नेल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खटके करीत आहेत.