लोणी काळभोर : पुणे-लातूर सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या इंजिनला अडकून आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लोणी (ता. हवेली) रेल्वे स्थानकात बुधवारी (ता.७) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-लातूर सुपरफास्ट एक्स्प्रेस ही प्रवासी रेल्वे गाडी आहे. ही गाडी पुणे ते लातूर आठवड्यातून चार फेऱ्या मारत असते. ही गाडी बुधवारी (ता. ७) नेहमीप्रमाणे पुणे स्थानकातून अंदाजे १२ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास लातूरच्या दिशेने निघाली होती.
लातूर एक्स्प्रेसने हडपसर रेल्वे स्थानक ओलांडल्यानंतर मांजरी रेल्वे स्थानकाजवळ एक व्यक्ती रेल्वेच्या समोर अचानक आली. चालकाने सर्व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दुष्टीने गाडी तशीच पुढे रेटली. संबंधित व्यक्तीला रेल्वेने जोरदार धडक दिली. या घटनेची माहिती चालकाने त्वरित रेल्वे कंट्रोल बोर्डाला दिली.
त्यानंतर लातूर एक्स्प्रेस स्थानकातून जात असताना, चालकाला इंजिनच्या पुढच्या बाजूला माणूस अडकल्याचे जाणवले. त्यानंतर चालकाने लोणी रेल्वे स्थानकात बुधवारी (ता. ७) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास गाडी थांबविली. पोर्टर व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वेच्या इंजिनला अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले.
दरम्यान, रेल्वे पोलिसांनी जखमीला त्वरित दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. मात्र, त्या अनोळखी व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यादृष्टीने पुढील तपास पुणे लोहमार्ग पोलीस करीत आहेत.