संदीप टूले
केडगाव : दौंड तालुक्यातील नामदेव बबन करगळ (रा. गिरीम, ता. दौंड) यांची मुलगी सुरेखा भाउसाहेब गडदरे हिला तिच्या सासरच्या मंडळींनी बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील शेततळ्यात हात ओढणीने बांधून, पाण्यात बुडवून मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृत मुलीच्या वडिलांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी सुरेखा हिचा आरोपींनी शारीरिक व मानसिक छळ, जाच करून तिला त्रास दिला. तसेच तिचे पती भाउसाहेब महादेव गडदरे, सासू ठकुबाई महादेव गडदरे (दोघे रा. मासाळवाडी) यांनी मासाळवाडी येथील तिच्या घराजवळील शेततळ्यामध्ये तिचे दोन्ही हात लाल रंगाच्या ओढणीने बांधून तिला पाण्यात बुडवून ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणात आशा सोनबा कोकरे आणि सोनबा चंदर कोकरे यांचाही समावेश असल्याचे म्हटले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास लवटे करीत आहेत.