पुणे : राज्यात सद्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण गाजत असतानाच पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अशाच एका घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. नगररस्त्यावरील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ‘इन्स्टाग्राम’वरुन ओळख झालेल्या चार वेगवेगळ्या मित्रांनी गोड बोलून या मुलीशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. या चौघांचा एकमेकांशी कुठलाही संबंध नाही. या घटना वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मित्रांसोबत घडलेल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या सर्व घटनांमुळे ही मुलगी नैराश्यामध्ये गेली होती. यासंदर्भात तिचे समुपदेशन सुरू होते. दरम्यान, महाविद्यालयात पोलिसांनी आयोजित केलेल्या ‘गुड टच, बॅड टच’ जागृती उपक्रमात हा प्रकार समोर आला आहे.
कोरेगाव पार्क पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोघांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. ओम आदेश घोलप (वय २०) आणि स्वप्निल विकास देवकर (वय २२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. तर, अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले होते. त्यांची बाल निरीक्षणगृहात रवानगी करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी एका महाविद्यालयात ‘गुड टच, बॅड टच’ संदर्भातील कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यावेळी एक तरुणी तणावाखाली होती. ती महाविद्यालयीत समुपदेशकाकडे गेली होती. स्वत:बद्दलची माहिती देत असतानाच तिने समुपदेशकाला स्वत:च्या मैत्रिणीबाबत देखील सांगितले. ती मुलगी सतत तणावाखाली असते. तसेच, तिच्याबाबत काहीतरी गैरप्रकार घडल्याचा संशय तिने व्यक्त केला. तिला अनेक मुलांचे फोन येत असल्याचेही तिने सांगितले होते.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत समुपदेशकाने पिडीत मुलीला तिच्या आई-वडीलांसह महाविद्यालयात बोलवून चर्चा केली. त्यावेळी पिडीत मुलीने तिने घडलेला सर्व प्रकार कथन केला. तिची ‘इंन्टाग्राम’वर वेगवेगळ्या चार मुलांशी ओळख झाली होती. त्यातून या मुलांनी गोड बोलून तिच्याशी वेळोवली शारिरिक संबंध प्रस्थापित केले. या घटना एप्रिल २०२४ ते सप्टेंबर या काळात वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या. समुपदेशकाने ही माहिती महाविद्यालयाच्या विश्वस्तांना कळवली. विश्वस्तांनी ही माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना दिली. त्यानंतर पिडीत मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक आरोपी हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असून इतर अन्य महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत. दोघे जण अल्पवयीन असून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा एकमेकांशी संपर्क असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. हा प्रकार एप्रिल ते सप्टेबर दरम्यान घडलेला आहे. कोणत्याही पार्टीमध्ये झालेला नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केला. तपास पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या आरोपींच्या शोधार्थ पाठविण्यात आले आहे. आरोपींना अटक करण्यात आली. पिडीत मुलगी, आरोपी व अल्पवयीन आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. गुन्ह्यातील घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवले आहे. तसेच, त्याचा डीव्हीआर जप्त केला. या गुन्ह्यातील पिडीत मुलगी, आरोपींच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण देखील करण्यात येत आहे. या तपासाकरीता सायबर तज्ञांची मदत घेतली जात आहे.
-स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त, परीमंडल दोन