पुणे : पुण्यातील केसनंद परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. चारित्र्याच्या संशयावरुन उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यातून प्यायला देऊन पत्नीच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पती, सासू, सासऱ्यांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पतीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव हनुमंत अंकुश गिरी असे आहे. या प्रकरणी सासू सरस्वती, सासरे अंकुश, दीर आदित्य (तिघे रा. सुलतानपूर, जि. बीड), नणंद सुजाता प्रल्हाद भारती, शिवाजी भारती (रा. वडवणी, जि. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साक्षी हनुमंत गिरी (वय २३, रा. केसनंद, नगर रस्ता) हिने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी हनुमंत याच्याशी साक्षीचा विवाह झाला होता. विवाहानंतर पती, सासू, सासरे आणि नातेवाईकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला.
दरम्यान, साक्षीचा पती हनुमंत कामानिमित्त केसनंद परिसरात स्थायिक झाला होता. हनुमंत सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. उंदीर मारण्याचे ओैषध पाण्यात टाकून साक्षीला देऊन तिच्या खूनाचा प्रयत्न केल्याचे साक्षीने फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक भालेराव करत आहेत.