पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने डोक्यात हत्याराने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना हडपसर येथील शिंद वस्तीमध्ये घडली आहे. या घटनेनंतर आरोपी पती त्याच्या लहान मुलाला घेऊन पसार झाला असल्याची माहिती मिळत आहे.
आरती देबीलाल सरेन (वय ३२, रा. शिंदे वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दत्तात्रेय चौधरी यांनी (वय ५५, रा. तुकाई दर्शन, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पती देबीलाल लक्ष्मणचंद्र सरेन (वय ४०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरेन दांपत्य पश्चिम बंगालमधील आहे. ते हडपसर परिसरातील शिंदे वस्ती परिसरात चौधरी यांच्या चाळीत राहतात. आरोपी देबीलाल आणि पत्नी आरती मजुरी करतात. त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून शुक्रवारी मध्यरात्री वाद झाला.
त्या वेळी देबीलालने पत्नीच्या डोक्यात हत्याराने वार केला. त्यात गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर आरोपी देबीलाल त्याच्या सहा वर्षांच्या मुलाला घेऊन पसार झाला. शेजाऱ्यांनी शनिवारी सकाळी आरती सरेन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिले. याबाबत चौधरी यांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली.