लोणी काळभोर : मागील तीन दिवसांपूर्वी २२ वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता एका ३० वर्षीय तरुणाने कौटुंबिक वादातून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर (ता. हवेली) येथे बुधवारी (ता. २८) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे.
नीलकंठ नेमिनाथ काळे (वय ३०, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नीलकंठ याने कौटुंबिक वादातून बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. तो कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील इनोवरा हायस्कूलच्या परिसरात पडला.
दरम्यान, नीलकंठला बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेला फोन केला. या घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णाला ताबडतोब लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.
त्यानंतर लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जे. जाधव, डॉ. रूपाली भंगाळे यांनी रुग्णांवर प्राथमिक उपचार केले. रुग्णाला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविले आहे.