पुणे : पुणे शहरात पावसाचा जोर सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच शहरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पुण्यात तीन तरुणांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथे हा प्रकार घडला आहे. अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या जागी हलवत असताना शॉक लागून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अभिषेक अजय घाणेकर (वय वर्ष 25) राहणार पुलाच्या वाडी डेक्कन, आकाश विनायक माने (वय वर्ष 21) राहणार पूलाची वाडी डेक्कन, शिवा जिदबहादुर परिहार (वय वर्ष १८) नेपाळी कामगार अशी मृत तरुणांची नावे आहेत. तिघे अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करत होते. रात्री गाडी बंद करून पाऊस जोरात आला म्हणून तिथे आवराआवर करायला परत गेले होते. तिथे गुडघाभर पाणी साचले होते. महावितरणाने घटनेची पुष्टी केली आहे. त्यांचे अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. पोलीस, महापालिका अधिकारीही घटनास्थळी पोहचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला होता. येथे काम करणारे तीन तरुण अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्या करता गेले असताना त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल केले होते. मात्र सदर तरुणांना उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी मयत घोषित केले.