पुणे: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, त्याची मुदत आज संपणार आहे. पाकिस्तानी नागरिक प्रामुख्याने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा वैद्यकीय उपचारासाठी भारतात येतात. या नागरिकांमध्ये बहुसंख्येने दीर्घ मुदतीचा व्हिसा घेतलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावात ७०० हून अधिक पाकिस्तानी असून अनेक नागरिकांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारले आहे आणि ते जळगावमध्ये स्थायिक झाल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. पाकिस्तानी नागरिक आलेले सिंधी समुदायाचे नागरिक, जळगावमध्ये स्थायिक झाल्याचे वृत्त आहे. सध्या पुण्यात १११ पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या परदेशी नोंदणी कार्यालयाने शहरात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबद्दल अपडेट दिले असून त्यातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. सध्या पुण्यात १११ पाकिस्तानी नागरिक राहत आहेत, त्यापैकी ९१ जणांकडे दीर्घकालीन व्हिसा आहे आणि २० जणांकडे स्टुडट व्हिसा आहे. दीर्घकालीन व्हिसा धारकांमध्ये ३५ पुरुष आणि ५६ महिला असून हा व्हिसा पाच वर्षांसाठी वैध आहे. पर्यटक व्हिसावर २० पाकिस्तानी नागरिक सध्या ९० दिवसांसाठी वैध असलेल्या व्हिसावर पुण्यात आहेत. देश सोडण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर आतापर्यंत तीन पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडल्याची माहिती शहर पोलिस दलातील परकीय नागरिक विभागाने (एफआरओ) दिली आहे.
जळगाव येथे राहणाऱ्या पाकिस्तानातील 700 पेक्षा जास्त सिंधी नागरिकांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारल्यानंतर भारत शासनाच्या अटी शर्तींचा पालन केले जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे घडलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भविष्यात पहलगामसारखी घटना जळगाव जिल्ह्यात सुद्धा घडू शकते, असा धक्कादायक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते गजानन मालपुरे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, परदेशी नागरिक भारतात आल्यावर संबंधित शहराच्या पोलिस आयुक्तालयात किंवा जिल्हा अधीक्षक कार्यालयात आपली नोंद अनिवार्यपणे करावी लागते. भारतात येणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडे नोंदणी करणे आवश्यक असते. परदेशी नागरिकांनी देशातील त्यांचे निवासस्थान बदलताना त्यांची नोंद करणे आवश्यक आहे. दरम्यान, परराष्ट्र विभाग व संबंधित यंत्रणांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.