नसरापूर : परिसरातील वरवे बुद्रुक (ता. भोर) येथे गावालगत घरकुलाचे बांधकाम सुरू असताना महावितरणच्या विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारांना लोखंडी शिडीचा स्पर्श झाल्याने ओंकार जगन्नाथ भंडारी (वय २२) याला जोराचा शॉक लागला. या अपघतातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे.
याप्रकरणी विजय गुंडय्या भंडारी यांनी राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक माहितीनुसार, ओंकार व त्याचे कुटुंबीय भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी गावालगत घरकुलाचे काम सुरू केले आहे. या बांधकामाजवळच महावितरणच्या विद्युत वाहून नेणाऱ्या तारांचे खांब आहेत. रविवारी (ता. १७) दुपारी बांधकाम सुरू असताना बांधकाम साहित्यातील लोखंडी शिडी नकळत विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारांना स्पर्श झाली त्यामध्ये ओंकार यास विजेचा झटका बसल्याने त्यास घराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत खाली पडला. त्याच्याजवळ एक लोखंडी पाइप पडला होता आणि त्याच्या हातापायासह अंगावर भाजल्याच्या जखमा झाल्या होत्या, असे त्याचे चुलते विजय गुंडय्या भंडारी यांनी पोलिसांना सांगितले. अपघातानंतर घरातील सदस्यांनी त्याला खासगी वाहनाने नसरापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी ओंकारचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याचे सांगितले.
दरम्यान, येथील विद्युतवाहक तारा खाली आल्याची तक्रार महावितरण कार्यालयास यापूर्वीच केली होती. मात्र, या तक्रारीकडे दुर्लक्ष झाले, असे ओंकारच्या कुटुंबीयांचे मत आहे.