लोणी काळभोर, ता. 18 : लोणी काळभोर येथील रामाकृषी रसायन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरला एका 35 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. शुक्रवारी (ता.3) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळला. यामुळे लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, अनोळखी मृताची ओळख पटवून त्याच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे लोणी पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी कॉर्नरकडून रामाकृषी रसायन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून काही नागरिक सायंकाळच्या सुमारास चालले होते. त्यांना रामाकृषी रसायन कंपनीकडे जाणाऱ्या पहिल्या कॉर्नरला एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यानंतर नागरिकांनी याची माहिती ताबडतोब लोणी काळभोर पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलीस हवालदार तेजस जगदाळे, नामदेव चव्हाण व पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह तात्काळ ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पुण्यातील रुग्णालयात तपासणीसाठी पाठविला आहे. या अनोळखी मृतदेहाच्या अंगावर कोणतीही इजा नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल. मात्र, सध्या अनोळखी मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे मृताच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचे लोणी काळभोर पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी केलं आवाहन
मयताच्या अंगावर काळ्या रंगाचा स्वेट शर्ट तर काळ्या रंगाची पॅन्ट आहे. त्याचे वय अंदाजे 35 असावे. त्याचा रंग काळा सावळा आहे. तर चेहऱ्यावर दाढी-मिशा आहे. अशा वर्णनाचा व्यक्ती आपल्या परिचयाचा असल्यास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी यांच्या 9022464375 या क्रमांकावर त्वरीत संपर्क करावा, असे आवाहन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केले आहे.