पुणे : आजचे मोदी हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची कृपा असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. पुण्यात ठाकरे गटाकडून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या मेळाव्यात खासदार संजय राऊतांनी हजेरी लावली होती. या मेळाव्याला उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हजेरी लावली.
गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर अटलबिहारी वाजपेयी हे नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरुन काढायचं म्हणत होते. त्यावेळी राजधर्माची आठवण करुन द्यायला अटलजी विसरले नव्हते. पण, जेव्हा लालकृष्ण अडवाणी बाळासाहेब ठाकरेंना विचारायला आले होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की, नरेंद्र मोदी गया तो गुजरात गया. तुम्ही नरेंद्र मोदींना काढू नका. जेव्हा संपूर्ण जग टीका करत होते, तेव्हा बाळासाहेबांनी हे सांगितलं. पण आता देश म्हणतोय की, नरेंद्र मोदी वापस आया तो पुरा देश गया. त्यामुळे मोदी जर पुन्हा आले तर लोकशाही, स्वातंत्र्य सर्व काही जाईल, असं म्हणत राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
ही शिवसेना हा उसळता सागर आहे. पुण्याच्या मैदानावर ही शिवसेना कशी उतरते बघा, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना देखील थेट इशारा दिला. तुम्ही आम्हाला शिल्लक सेना म्हणता. परंतु, 2024 नंतर तुम्हीच शिल्लक राहणार का हा विचार करा. या महाराष्ट्रात ज्याला शिल्लक सेना म्हणता तीच सेना आम्ही पुन्हा सत्तेवर आणून दाखवू, असं देखील संजय राऊतांनी म्हटलं.