मुंबई: पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबीयासमोर उभे ठाकलेले माजी मंत्री विजय शिवतारे हे कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनीही शिवतारे यांना आपल्याला युतीधर्म पाळला पाहिजे, असे सांगितले होते. मात्र, विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात सुरु केलेली जंग थांबवण्यास नकार दिला आहे. त्यानंतर यावर उपाय म्हणून शिवसेनेकडून विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी केली जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडून माजी मंत्री विजय शिवतारे यांना लवकरच पक्षाची शिस्त भंग केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यानंतरही शिवतारे यांनी पक्षादेश पाळला नाही, तर त्यांना शिवसेनेकडून बाहेर केलं जाईल, असे सांगितले जात आहे. शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात मोहीम उघडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: विजय शिवतारे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही शिवतारे हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर शिवतारे यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडून मोठा वाद निर्माण होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी विजय शिवतारे यांच्यावर अखेर कारवाई करण्याचे ठरवले असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान माजी मंत्री विजय शिवतारे यांना शिवसेनेकडून त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या संभाव्य शिस्तभंगाच्या कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी उत्तर देताना म्हटले की, मला पक्षाकडून अद्याप कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. तसेच मी उद्या पुणे शहरातील खडकवासला मतदारसंघाचा दौरा करणार आहे. मी बारामतीमधून अपक्ष लोकसभा निवडणूक लढण्यावर आपण ठाम आहे, असे शिवतारे यांनी सांगितले.