पुणे : शिरूरमध्ये आढळराव पाटील हे शिंदे गटाकडून लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, जागावाटपात ही जागा विद्यमान खासदार म्हणून अजित पवार गटाकडे गेल्याने आढळराव पाटील यांची अडचण झाली होती. शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमधून घड्याळाच्या चिन्हावर लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आज त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याचीही चर्चा आहे. याबाबत शिवाजीराव आढळराव पाटील यांनीच खुलासा केला आहे. बैठकीला जाण्याआधी टीव्ही ९ शी बोलताना आढळराव पाटील यांनीच शिक्कामोर्तब केला आहे.
काय म्हणाले शिवाजीराव आढळराव पाटील?
आज अजित पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासोबत शिरूर लोकसभा उमेदवारीबाबत बैठक बोलावली आहे. यावेळी अजित पवार गटामध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रवेश होणार असल्याच्या वृत्तावर खुद्द त्यांनीच शिक्कामोर्तब केलं आहे. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर यासंदर्भातल्या बैठकीसाठी जाण्यापूर्वी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आढळराव पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, मला काल अजित पवार यांनी फोन करून सांगितलं आहे की उद्या सकाळी चार ते पाच आमदारांना बोलवतोय. आपण सगळे बसून चर्चा करुयात. पुढचं नियोजन कसं करायचं यावर आपण बोलुयात. त्यानुसार मी बैठकीसाठी निघालो आहे. काल माझ्याशी एवढंच बोलणं झालं होतं. मी माध्यमांमधूनच ऐकतोय की अजित पवार गटात आज प्रवेश होणार आहे. तसं असेल तरी हरकत नाही, असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.
शिरुरमध्ये बेडूक उड्या विरुद्ध एकनिष्ठता अशी लढत : अमोल कोल्हे
शिरुरमध्ये बेडूक उड्या विरुद्ध एकनिष्ठता अशी लढत आहे. आढळराव पाटील यांना चौथ्या पक्ष प्रवेशाच्या मनपूर्वक शुभेच्छा. राजकीय ताकदवान नेत्यांना उमेदवार आयत करावं लागणं हेच माझे यश आहे. केवळ पदासाठी सुरू असलेले तडजोडीचे राजकारण जनता बघत आहे, असे म्हणत समोर काय आहे? कोण आहे? याचे आव्हान करत नाही, असा टोला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे.