लोणी काळभोर: लोणी काळभोर आणि परिसरातील नागरिकांसाठी एक चांगली आणि सुखद बातमी आहे. लोणी काळभोरकरांचा पुण्यापर्यंतचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकर होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवाजीनगर ते लोणी काळभोर यादरम्यान मेट्रो सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शिवाजीनगर ते लोणी काळभोर हे २१ किलोमीटर अंतर आहे. हे अंतर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी थेट दुचाकी चालवत पाहणी केली. शनिवारी (ता. १३) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथून मेट्रोच्या रस्त्याची पाहणी करण्यात सुरुवात केली. त्यानंतर पुलगेट, हडपसरमार्गे पाहणी करीत लोणी काळभोरपर्यंत आले. लोणी काळभोर येथील राहिंज वस्ती परिसरात आल्यानंतर मेट्रो कारशेडच्या जागेची पाहणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांची मेट्रो सुरु करण्याच्या बाबातीत सकारात्मक चर्चा झाली.
लोणी काळभोरपर्यंत मेट्रो होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. तर विभागीय आयुक्त व महानगरपालिकेचे आयुक्त अशा दोन बड्या अधिकाऱ्यांनी मोटारसायकलवरून पाहणी करण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असेल. लोणी काळभोरपर्यंत मेट्रो येणार असल्याने नागरिकांना सुखद धक्का बसला आहे.
दरम्यान, शिवाजीनगर ते लोणी काळभोर विस्तारित मेट्रो प्रकल्प ‘खासगी भागीदारी तत्त्वावर’ (पीपीपी) की ‘ठेकेदाराची नेमणूक करून’ (ईपीसी) राबविणे योग्य आहे, याची तपासणी करण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) आर्थिक तांत्रिक सल्लागार नेमण्यात आला आहे.