शिरुर, (पुणे) : लोकसभेच्या निवडणुकीसाठी हाताला घड्याळ बांधणार असलो तरीही माझ्या हातात शिवबंधन कायम बांधलेलं असेल, असं शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील पक्षप्रवेशापुर्वी म्हणाले आहेत. आढळराव पाटील आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे.
पुढे बोलताना म्हणाले, महाविकासआघाडी सरकारच्या काळात मी अजित पवारांवर नव्हे तर उद्धव ठाकरेंवर टीका करायचो असा दावा देखील आढळराव पाटलांनी केला आहे. आजचा प्रवेश ही घरवापसी अथवा लोकसभेच्या अनुषंगाने पर्याय नाही. तर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हे आम्ही उचलेलं पाऊल आहे. तसेच अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचं अजित पवारांनी दिलेलं आव्हान मी माझ्या खांद्यावर घेत आहे, असा विश्वास आढळरावांनी व्यक्त केला आहे.
शिरुरची जागा मिळवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु होते. अजित पवार महायुतीत सामील होण्याआधीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला सांगितलं होतं की शिरुर मतदार संघात काम सुरु करा, आपल्याला मतदार संघ जिंकायचा आहे. तेव्हापासून पायाला भिंगरी लावून मतदार संघाचं काम करत आहे. काम करण्यासाठी महायुतीच्या सरकारने प्रचंड बळ दिलं आहे. विकास निधी दिला. सर्व प्रकारचं सहकार्य केलं, असंही यावेळी बोलताना आढळराव पाटील म्हणाले.
पुढे म्हणाले, ही घरवापसी नाही आणि मी पक्ष बदलणाऱ्यातला नाही, 20 वर्ष धनुष्यबाणाशी प्रामाणिक आहे आणि राष्ट्रवादीत प्रवेश करेपर्यंत प्रामाणिक राहिलो आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. यासोबतच अमोल कोल्हेंवर निशाणा साधत म्हणाले, नाटकाच्या स्टेजवर शिवशाही दाखवून लोकांची मतं मिळवण्याची परिस्थिती आता राहिली नाही, अशी टीका अमोल कोल्हे यांच्यावर केली.