शिरूर: सर्वसामान्य जनतेचा खासदार म्हणून तुम्ही मला संसदेत पाठवले. त्यातून ११०२ प्रश्न मांडून तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. त्यामुळे संसदरत्न खासदार म्हणून गौरविण्यात आले. यापुढे देखील शेतकऱ्यांचे प्रश्न, बिबट समस्या, विज, रस्ते व पाणी यासारख्या प्रश्नासाठी लढायचे आहे. मागील पाच वर्षे मतदारांची निराशा करत एक रूपयाचा निधी आणला नाही. त्याउलट ८० टक्के निधी परत गेला. अशा उमेदवारांना तुम्ही मत देणार का? असा सवाल करत मिरवणाऱ्या उमेदवाराला घरी बसविण्याची वेळ आली आहे, अशी टिका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
कवठे येमाई (ता. शिरूर) येथे बालाजी मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होत. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, प्रदिप वळसे पाटील, पुर्वा वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, राजेंद्र गावडे, डॅा. सुभाष पोकळे, मारूती शेळके, सुदाम इचके, बाळासाहेब बेंडे, बापूसाहेब शिंदे, प्रकाश पवार, सदाआण्णा पवार, अरूण गिरे, रविंद्र करंजखिले, सविता बगाटे, बाळासाहेब डांगे, सरपंच, उपसरपंच, चेअरमन व ग्रामस्थ उपस्थित होते.
आढळराव म्हणाले की, लोकसभेची निवडणूक ही देशाची भविष्य घडविणारी असते. मागील वेळी केलेली चूक आता पुन्हा करायची नाही. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार व महिलांचे प्रश्न उपस्थित करून देशाच्या विकासात हातभार लावायचा आहे. बैलगाडा शर्यतीसाठी स्वतः च्या अंगावर केसेस घेऊन दोन वेळा बंदी उठवली. खासदार मात्र बिनकामाचे श्रेय घेत आहेत. त्यासाठी सगळ्यांनी एकजूटीने व एकदिलाने मतदान प्रक्रियेत सामिल व्हा.
गावडे म्हणाले की, आढळराव हे शेतकऱ्यांचे नेते असल्याने त्यांनी आपल्या जमिनीशी असलेली नाळ जपली आहे. त्यांना पुढील पाच वर्षात आपल्या विकास कामांसाठी भरभरून साथ दिली पाहिजे. सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांची त्यांना साथ असल्याने सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रीत येऊन बुथ नुसार मतदान करून घ्या.
पुर्वा वळसे पाटील म्हणाल्या की, या मेळाव्यात मी सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांची प्रतिनिधी म्हणून आले असून आढळराव पाटील यांचे सर्वसामान्यांसाठी मोठे योगदान आहे. ग्रामीण भागातील मुलांमुलीसाठी क्रिडा व शिक्षणासाठी विशेष लक्ष असते. कोरोनाच्या काळात देखील त्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला. अशा नेत्याला संसदेत पाठवा. यावेळी पोकळे म्हणाले की, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन मंत्रालयात गेलो की, त्या प्रश्नांना तातडीने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मार्गी लावले आहे. अशाच नेत्यासाठी जनतेने त्यांना साथ दिली पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा-शिवसेना, आरपीआय ( ए) ,रासप, मनसे महायुतीचे कार्यकर्ते पहिल्यांदाच मोठ्या संख्येने एकत्रीत आले होते. पांरपारिक वाद्य व फुलांच्या वर्षावात महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटिल यांची मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. परिसरातून मोठ्या संख्येने यावेळी कार्यकर्ते व नागरिक तसेच मतदार उपस्थित होते. यावेळी मोबाईल टॅार्च लावून आढळराव पाटील यांना मतदारांनी साथ दिल्याचे चित्र होते.