पुणे : लोकसभा निवडणूका जशा जवळ येतील तशा राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच आता शिवसेनेतील १२ आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. याबाबत काल वकील असीम सरोदे यांनी एक यादी वाचून दाखवली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. दोन दिवसात जागावाटप होईल असं सांगितलं जात आहे. भाजपने शिंदे गटाच्या आधीपेक्षा जागा कमी केल्या असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजीचा सुर असल्याचं चित्र दिसत आहे. यामुळे आता काही नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे तर्क वितर्क लावले जात आहेत.
१२ आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परतणार; असीम सरोदे यांचा दावा
काल एका सभेत बोलताना वकील असीम सरोदे यांनी शिवसेनेतील बारा आमदारांची यादी वाचून दाखवली आहे. हे आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडे परतणार असल्याचा दावा असीम सरोदे यांनी केला आहे. दरम्यान, असीम सरोदे यांनी केलेल्या दाव्यातील दोन आमदार आधीपासून ठाकरे गटात आहेत, उदयसिंह राजपूत आणि नितीनकुमार देशमुख (तळे) ठाकरे गटात आहेत. मात्र इतर १० आमदार परत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात येण्यास तयार आहेत. कारण त्यांच्या लक्षात आले आहे की आपलं यांच्यासोबत भविष्य नाही. ज्यांना ठाणे जिल्ह्याच्या बाहेर ओळख नाही, असा टोलाही सरोदे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.
यादीत या आमदारांची नावे
आमदार श्रीनिवास वनगा
आमदार लता सोनवणे
महेंद्र दळवी
प्रकाश सर्वे
बालाजी कल्याणकर
चिमणराव पाटील
नितीनकुमार तळे
प्रदीप जैसवाल
उदयसिंह राजपूत
महेश शिंदे
प्रकाश आबिटकर