शिरुर : शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीकडून शिरूरच्या मैदानात उतरणार आहेत. आजच ते राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. आज (ता. २६) संध्याकाळी चार वाजता मंचरच्या शिवगिरी मंगल कार्यालयात अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटलांचा पक्षप्रवेश होणार आहे.
आढळराव पाटील बऱ्याच दिवसांपासून शिरूरमधून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. महायुतीमध्ये शिरूर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे या जागेवरून निवडणूक लढण्यासाठी आढळराव पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. शिरूरची जागा जिंकण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर आज आढळरावांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. अजित पवार स्वत: आढळराव पाटलांच्या हाती घड्याळ बांधणार आहेत. त्यामुळे शिरुरमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट उभा ठाकणार आहे.
आढळराव पाटलांना राष्ट्रवादीतून अमोल कोल्हेंच्या विरोधात मैदानात उतरवण्यासाठी सुरुवातीला चांगलाच विरोध होता. मात्र, अजित पवारांनी नाराजांची नधरणी करत आढळरावांच्या मार्गातील अडथळे दूर केले. त्यानंतर बोलताना आढळराव म्हणाले की, अमोल कोल्हे हे २०१९ मध्ये शिवसेनेकडून राष्ट्रवादीमध्ये गेले. ती त्यांची बेडूक उडी होती. पण आता मी तिन्ही पक्षाकडून सहमतीने राष्ट्रावादीमध्ये प्रवेश करत आहे. यात मोठा फरक आहे. मला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागितले की, राष्ट्रवादीमधून लढा… म्हणून मी तयार झालो. आता मी महायुतीचा उमेदवार आहे. मी गद्दारी केली नाही.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अनेक ठिकाणी शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होत आहे. बारामती आणि शिरूर मतदारसंघांमध्ये अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. अजित पवारांसमोर दोन्ही ठिकाणी तगडं आव्हान आहे. बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढणार आहेत तर शिरुरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.