लोणी काळभोर : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कुंजीरवाडी (धुमाळमळा, ता. हवेली) येथील श्रीनाथ तरुण मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून सोमवारी (ता.१९) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. धुमाळमळा परिसरात भगवे झेंडे व पताका लावण्यात आल्या होती. महिलांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तिसमोर आकर्षक रांगोळी काढून फुलांची सजावट केली होती. किल्ले पुरंदरवरून ज्योत घेऊन श्रीनाथ तरुण मंडळाचे युवा मावळेसोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आले होते. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून सार्वजनिक शिवआरती घेण्यात आली. त्यानंतर सर्वांना गोड प्रसाद वाटण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, थेऊर फाटा येथून शिवजयंतीची मिरवणूक सायंकाळी ६ वाजता सुरु झाली. या मिरवणूकीत अबालवृध्द्धांसह शेकडो शिवभक्त भगवे फेटे बांधून पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते. ढोल-ताशा पथक आपली कला सादर करत होते. यावेळी सप्तरंग युद्धकला अकॅडमीतर्फे शिवकालीन मर्दानी खेळ असणाऱ्या लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
शिवरायांचा जयघोषात आसमंत दुमदूमला
शिवजयंतीनिमित्त लहान मुलांची भाषणे झाली. शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडून सांगताना या लहानग्यांच्या डोळ्यांत अनोखे तेज पाहण्यास मिळाले. छोटेखानी भाषणे झाली. यावेळी शिवरायांच्या जयघोषणाने परिसर दुमदूमला. शिवविचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर आपल्या संपूर्ण समाजाला नक्कीच दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही.