लोणी काळभोर ता.१९ : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मीडियम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात सोमवारी (ता. १९) साजरी करण्यात आली. याबाबतची माहिती शाळेच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे यांनी दिली.
शिवजयंती निमित्ताने शाळेमध्ये सजावट करण्यात आली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शाळेतील लहान मुलांनी शिवछत्रपती यांच्या गाण्यावर नृत्य सादर केले. तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी शिवगर्जना तर लहान गटातील समर गायकवाड या विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला.
दरम्यान, नववीतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वावर भाषणे केली. शिवाजी महाराज नाचून नाही तर वाचून उमगणारे राजे आहेत, असे मत विद्यार्थ्यांनी मांडले. तर शिक्षिका प्रीती कदम व दीपाली म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांबद्दल इतिहास सर्व मुलांना सांगितला.
यावेळी प्राचार्या पौर्णिमा शेवाळे म्हणाल्या की, आज 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यासह देशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती आहे. याचेच औचित्य साधून शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्री प्रायमरी इन्चार्ज सुलताना इनामदार, शाहीन शेख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम साबळे यांनी केले तर आभार रेणुका पवार यांनी मानले.