हडपसर : पद्मश्री पुरस्कार विजेत्या स्कायडायव्हर शीतल महाजन हिने रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टजवळ भारतीय ध्वजासह सर्वात उंच फ्लॅग जंप लँडिंग करत विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या या कामगिरीमुळे त्या एव्हरेस्टजवळ राष्ट्रध्वजासह स्कायडायव्हिंग करणाऱ्या पहिल्या भारतीय तर, तीन ध्रुवांवर स्कायडाइव्ह करणारी जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. या कामगिरीमुळे जगातील दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव आणि माऊंट एव्हेरस्टसमोर पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन यशस्वी लँडिंग करणारी ती पहिली महिला ठरली आहे.
दरम्यान, शीतल महाजन ही माऊंट एव्हरेस्टसमोर पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन उतरणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. सर्वांत उंच ठिकाणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारुन उतरणारी पहिली भारतीय महिला आणि सर्वांत उंच ध्वज स्कायडायव्हिंग महिलांनी केल्याचा मान मिळवत शीतलने तीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले आहेत. पद्मश्री महाजन यांनी माउंट एव्हरेस्ट परिसरातील सांगबोचे येथे स्कायडायव्हिंग केले. त्यानिमित्ताने त्यांनी उत्तर व दक्षिण ध्रुवानंतर माउंट एव्हरेस्ट या तिसऱ्या ध्रुवावर स्कायडाइव्ह करून जगातील पहिली महिला होण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी १२ हजार पाचशे फूटावरून भारतीय ध्वजासह लँडिंग केले.
भारतीय ध्वजासह माउंट एव्हरेस्टजवळ सर्वांत उंच फ्लॅग जंप लँडिंग पूर्ण करीत असताना हा विक्रम घडत होता. एव्हरेस्टच्या चित्तथरारक पार्श्वभूमीवर महाजन भरारी घेत असताना तिरंगा फडकतानाचे नयनरम्य दृष्य अनेक नागरिकांनी अनुभवले. याबाबत बोलताना शीतल महाजन म्हणाली की, माऊंट एव्हरेस्टसमोर पॅराशूट जंप करण्याचे स्वप्न २००७ मध्ये पहिले. आज ते प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद आहे.
माऊंट एव्हरेस्ट समोर २३ हजार फूट उंचीवरुन ‘एएस ३५० बी-३’ या हेलिकॉप्टरमधून उडी मारल्यावर १८ हजार फूट उंचीवर पॅराशूट उघडण्यात आले. एव्हरेस्ट सर करताना स्यंगबोचे (१२,४०२ फूट), अमादाबलम बेस कॅम्प (१५,००० फूट) व कालापत्थर (१७,५०० फूट) याठिकाणी मुख्य माऊंट एव्हरेस्ट जंप करण्यापूर्वी तीन पॅराशूट जंप करण्यात आली. यासाठी उंचीवर २६० ते ४०० चौरस फूटाचे मोठ्या आकाराच्या पॅराशूटचा वापर केला. बर्फाच्छादित हिमालयातील हवामानाचे स्वरुप गतिमान व सतत बदलत असते. आतापर्यंतच्या प्रत्येक एव्हरेस्ट मोहिमेची योजना अत्यंत अनुकूल हवामानाच्या अनुषंगाने आखण्यात आली तरी ऐनवेळी हवामानात बदलत होतात ते मला अनुभवास आले.
शीतल महाजन म्हणाली की, या अतिउंचीवरील स्कायडायव्हिंगसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्यक असते. त्यादृष्टीने पाॅल हेन्री डी बेरे, ओमाल अलहेगेलन, वेंडी स्मिथ, नादिया सोलोव्येवा यांची साथ लाभली. एक्सप्लोर हिमालय या स्कायडायव्हिंगचे संस्थापक सुमन पांडे यांनी नेपाळमध्ये सहकार्य केले. आतापर्यंत कोणत्याही भारतीय महिला स्कायडायव्हरने माऊंट एव्हरेस्ट परिसरात स्कायडायव्हिंग केले नव्हते, ही विक्रम करण्याची संधी मला यारुपाने मिळाली, असेही शीतलने सांगितले.
या मोहिमेसाठी रिलायन्स फाऊंडेशनच्या नीता अंबानी, अंनत अंबानी यांनी आर्थिक पाठबळ दिल्याचे शीतलने सांगितले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अशोक जैन, एरोइंडिया क्लब इंडियाचे अध्यक्ष राजीव प्रताप रुडी, खासदार प्रशांत बाघ यांनी सहकार्य केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी प्रोत्साहित केले.आई ममता महाजन, भाऊ हर्षल महाजन, पती वैभव राणे व मुले वैभव व वृषभ राणे यांनी घरातून पाठबळ दिल्याने आजचा विक्रम प्रस्थापित करु शकले. त्याचप्रमाणे माझे दिवंगत वडील कमलाकर महाजन यांनी मला माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी सातत्याने प्रोत्साहित केले, आज त्यांचे स्वप्न पूर्ण करु शकल्याचा आनंद आहे, असेही तीने सांगितले.
आजच्या या दिवसाची मी १६ वर्षांपासून प्रतिक्षा करीत होते. ते माझे मोठे स्वप्न होते. संयम आणि दृढनिश्चयाने स्वप्ने सत्यात उतरू शकतात याचा हा पुरावा आहे. भारतीय महिलेने एव्हरेस्ट प्रदेशात ध्वजासह स्कायडायव्हिंग पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ आणि ती महिला मी असल्याचा आनंद अद्वितीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या सहभागासाठी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी कृतज्ञ आहे.’
– पद्मश्री शीतल महाजन, स्कायडायव्हर