प्रदिप रासकर
निमगाव भोगी : शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत दिवसेंदिवस गुन्ह्याचा आलेख उंचावत असुन शहर तसेच ग्रामीण हद्दीत मोठया प्रमाणात गुन्हे घडत आहेत. शिरुर शहरातुन चारचाकी गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याची गाडी चोरीला गेल्याने सर्वसामान्य जनतेचा पोलिस प्रशासनावरचा विश्वास उडत चालला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच थेट प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनला ‘सिंघम’ अधिकाऱ्याची गरज असल्याची चर्चा सगळीकडे दबक्या आवाजात सुरु आहे.
शिरुर पोलिस स्टेशनची हद्द पुर्वला तांदळी ते पश्चिमेकडे काठापुर खुर्द एवढी असुन शिरुर पोलिस स्टेशन अंतर्गत टाकळी हाजी, न्हावरे, मांडवगण फराटा या ठिकाणी औट पोस्ट आहेत. परंतु शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली असुन गेल्या अनेक दिवसांपासुन अनेक गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. तसेच खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात अंतर्गत मतभेद असल्याने त्याचा थेट परीणाम कामावर होत असल्याची चर्चा आहे.
वसुली बहाद्दरांमुळे गुन्हेगारीला मिळतेय बळ?
शिरुर शहरातील ‘दहा इलेव्हन कॅफे’ मध्ये साध्या वेशात जाऊन कॅफेत चाललेल्या गैरप्रकाराबाबत पोलिसांनी कारवाई केली. शिरुर शहरात अजुनही अनेक ठिकाणी असे गैरप्रकार चालु असुन त्याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. शिरुर शहरात मोठ्या प्रमाणात गुटका, मटका, गावठी दारुची विक्री चालते. परंतु पोलिस स्टेशन मधील वसुली बहाद्दरांमुळे यावर कारवाई होत नसल्याचीही दबक्या आवाजात शिरुर शहरात चर्चा सुरु आहे.
साहेबांच्या मर्जीत न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बंदोबस्त?
शिरुर पोलिस स्टेशनला काही वसुली बहाद्दर हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे त्यांना कधीच कुठल्याच बंदोबस्तासाठी पाठवलं जात नाही. परंतु साहेबांची मर्जी न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र जाणीवपूर्वक कायमच कोणत्या ना कोणत्या बंदोबस्तासाठी पाठवलं जात असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राहिलेला नसल्याचीही चर्चा रंगत आहे.
शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत प्रभावीपणे रात्रगस्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. तसेच याकरिता प्रत्येक गावातील ग्रामसुरक्षा दलाची मदत घेण्याचे नियोजन केले आहे.
-प्रशांत ढोले, उपविभागीय अधिकारी, शिरुर