शिरूर : शिरूर शहरातील व पोलीस स्टेशन हद्दीतील पळवून नेलेल्या, बेपत्ता असलेल्या मुली व महिलांचा शोध घेण्यात शिरुर पोलिसांना यश आले आहे. सापडलेल्या मुली व महिला नातेवाईकांकडे सुखरुप देण्यात आल्या आहेत. शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ या महिन्यात पोलीस स्टेशनमध्ये चार अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
पोलिसांच्या पथकांनी चारही मुलींचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात सुखरुप दिले आहे. तसेच चार महिला व सहा मुली बेपत्ता असल्याच्या वेगवेगळ्या तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या. यापैकी तीन महिला व सहा मुलींचा शोध घेऊन त्यांनाही नातेवाईकांच्या ताब्यात सुखरुप दिले आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.