Shirur News : शिरूर, ता.२३ : राज्यात नाशीक, पुणे, सोलापूर, अहमदनगर व औरंगाबाद हे जिल्हे कांदा उत्पादनात अग्रेसर आहेत. मात्र या सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान न देता चुकीच्या जाचक अटी घातल्या. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारले. कांद्यावर निर्यात शुल्क लादणे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय आहे. केंद्र सरकारने जानेवारी महिण्यात अनुदान जाहीर करून ते दिले नाही. आठ दिवसात निर्णय न घेतल्यास पुणे जिल्ह्यात तीन मंत्र्याच्या गाडीवर कांदा फेकला जाईल. असा इशारा मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवदत्त निकम यांनी दिला. (Shirur News)
कांद्यावर निर्यात शुल्क लादणे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय
आळेफाटा (ता. जुन्नर) येथे पुणे – नाशिक व पुणे – अहमदनगर या चौकात हा रस्ता बंद करून शिरूर चे खासदार डॅा. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता बंद आंदोलन छेडले. यावेळी गळ्यात माळा घालून केंद्र व राज्य सरकार विरूद्ध जोरदार टिका केली. या अंदोलना दरम्यान झालेल्या सभेत निकम बोलत होते.
पुढे बोलताना निकम म्हणाले की, आगामी लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महागाई आटोक्यात आणण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारला तो तातडीने रद्द करावा. कांदा साठवणीतून शेतकऱ्याला पैसा मिळणार असल्याने सरकारने हा शुल्क वाढीचा निर्णय घेतला. साठवणूकीच्या कांद्यातून खराब झालेल्या कांद्याचा हिशोब हे सरकार करत नाही. देशातील एकून कांदा उत्पादनापैकी ३० टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते. (Shirur News)
दरम्यान, शिरूर, आंबेगाव, जुन्नर व खेड या चार तालुक्यात बिबट ही समस्या मोठी आहे. त्यातून बिबट्याच्या हल्ल्याने पाळीव प्राणी व मनुष्याचा जीव धोक्यात आहे. शेतकऱ्यांना शेतावर काम करताना दिवसा विज देण्यासाठी अनेकवेळा निवेदन दिली आहेत. मात्र अद्यापही त्याचा काहि उपयोग झाला नाही. भविष्यात दिवसा विजेसाठी देखील सर्वाना एकत्रीत येऊन लढावे लागणार असल्याचे निकम यांनी सांगितले. (Shirur News)
या अंदोलनात विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पाडुंरग पवार, माऊली खंडागळे, मोहित ढमाले, अंकुश आमले, देवराम लांडे, शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे, रामदास ढोमे, आंबादास हांडे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, गणेश कवडे, सुरेश चौधरी, अॅड विजय कुऱ्हाडे, निलेश भुजबळ, बाजीराव ढोले, मंदा दागट, शांता यादव आदी सहभागी झाले होते. (Shirur News)
यावेळी खासदार डॅा. अमोल कोल्हे, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांचे भाषण झाले.