युनूस तांबोळी
Shirur News : पुणे : शिरुर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील १४ गावं नेहमीच दुष्काळाला तोंड देत आलेली आहेत. दुष्काळ हा आपल्या जणू पाचवीलाच पुजलेला. कधी अतिवृष्टी नाहीतर कायमच कोरडा दुष्काळ असा नेहमीचा निसर्गाचा खेळ पाहतोय. या दुष्काळाची झळ वर्षाकाठी नेहमीचीच. नेते मंडळी देखील यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढत नाही. या भागातील गावे, वाडीवस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा चालू आहे. जनावरांना चारा नाही, दुष्काळाने जगणं मुश्किल केले आहे. पाणी नसल्याने शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात 14 गावात पाणी पेटले असून, आंदोलन करण्याच्या तयारीत शेतकरी व नागरिक एकत्रित येऊ लागले आहेत.
शेतकरी व नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत
दुष्काळग्रस्त पाणी हक्क संघर्ष समिती स्थापन करुन पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्यासाठी गावं संघटित झाली आहेत. साहेब, दादा, आण्णा, भैया, कार्यसम्राट, भाग्यविधाते, राजकीय दैवत यांना आता पाणी मिळेपर्यंत बासनात गुंडाळून ठेवा. अशा तीव्र भावना शिरूर तालुक्याच्या 14 गावात ग्रामसभा घेऊन व्यक्त केल्या जात आहेत.
शिरूर तालुक्यात कान्हूर मेसाई, लाखेवाडी, मोराची चिंचोली, शास्ताबाद, खैरेनगर, खैरेवाडी, धामारी, पाबळ, केंदुर, मिडगुलवाडी, हिवरे, सोनेसांगवी, जातेगाव, पिंपळवाडी यावर्षी दुष्काळी गावे म्हणून ओळखली जातात. या गावांना दरवर्षी कमी पावसाला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतीसाठी पाणी नसणारी ही गावे आहेत. या भागातील राजकिय नेते उन्हाळ्यात पिण्यासाठी टॅंकर व चारा छावणी उभ्या करतात.(Shirur News) पण ही तात्पुती योजना या गावांच्या विकासाला खिळ बसवणारी ठरत आहे. त्यामुळे या भागातील जुन्या पिढीबरोबर नवीन पिढी दुष्काळाच्या झळा घेताना दिसत आहे. कायमस्वरूपी शेतीसाठी पाणी मिळावे. त्यासाठी कलमोडी, डिंभा व चासकमान धरणाच्या माध्यमातून या भागात उपसा सिंचन पद्धतीने पाण्याची उपलब्धता शेतीसाठी करावी. ही प्रमुख मागणी या भागातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे. या मागणीसाठी या चौदा गावात ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात आले आहेत. या ग्रामसभांना नागरिक प्रतिसाद देऊ लागली आहेत.
यावेळी शेतीला पाणी मिळाले नाही तर मतदानावर बहिष्कार, नेते मंडळींना गावात फिरकू देणार नाही, आंदोलनासाठी पाठिंबा असे वेगवेगळे ठराव ग्रामसभेतून घेतले गेले आहेत. कोणत्याही प्रकारे पाणी मिळण्यासाठी ही 14 गावे एकत्रित आली असून, या भागातील पाणी पेटले आहे.
…तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही
शिरूर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातल्या किंवा कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने अथवा नेत्याने आपण करत असलेल्या पाणी आंदोलनाची दखल घेऊन तात्पुरते आश्वासन दिल्यास आपण आंदोलन स्थगित करणार नाही. जोपर्यंत जलसंपदा विभागाचा 14 गावांना शेतीसाठी पाणी देण्याचा जीआर निघत नाही. (Shirur News) प्रत्यक्षात काम चालू होत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. नेते मंडळी गोडगोड बोलून आंदोलन थांबवतील. गावातील लोकप्रतिनिधींनी कमिटीने आंदोलन थांबवल्यास माझ्यासारखा सर्वसामान्य नागरिक राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा कार्यालयात पेटवून घेतल्याशिवाय राहणार नाही.
– शांताराम जिते, ग्रामस्थ
पाबळची ग्रामसभा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सर्वांनी हिररीने भाग घेतला व मतदानावर बहिष्कार, चासकमान, डिंब्याचे पाणी मिळण्यासाठी 14 गावे दुष्काळग्रस्त पाणी हक्क संघर्ष समिती तालुका शिरूर यांना पाठिंबा अशा प्रकारचे ठराव एकमताने संमत झाले. (Shirur News) पाबळच्या पाण्याचा विचार एवढेच ध्येय समोर ठेवून ही ग्रामसभा पार पडली.
– पाबळ ग्रामस्थ
…अन्यथा आंदोलन करणार
दुष्काळाची तीव्रता जास्त असून, या भागाला दरवर्षी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पाणी व चारा ही मोठी समस्या असून, जनावरे विकण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यांवर आली आहे. (Shirur News) डिंभा उजवा कालवा किंवा घोडनदीचे पाणी उपसा सिंचन पद्धतीने या गावांना द्या. नाहीतर यावेळी सगळेच आंदोलनावर ठाम आहेत.
– दादा खर्डै, कान्हूर, मेसाई ग्रामस्थ
आंदोलनाची दिशा ठरणार…
पाबळ येथे शिरूर तालुका पाणी संघर्ष समितीची बैठक सोमवार (ता. 18) मारुती मंदिर लोणी चौक या ठिकाणी ठीक दहा वाजता सुरू होईल. 14 गावातील ग्रामस्थांनी ग्रामसभेचा आंदोलनाच्या पाठिंब्या बाबत ठराव घेऊन या बैठकीस हजर रहावे. या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. त्याबरोबर अभ्यासपुर्वक पाणी मिळण्यासाठी उपाय याबाबत चर्चा होईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : पारोडीत वनविभाग व ग्रामस्थांच्या सहभागातून वनराई बंधाऱ्यांची उभारणी