अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला
देखा पिलांसाठी तिनं, झोका झाडाले टांगला
तिची उलूशीच चोच, तेच दात, तेच ओठ
तुला देले रे देवानं, दोन हात दहा बोटं
Shirur News : सुगरणीच्या खोप्याची कारागिरी ‘बहिणाबाईं’नी आपल्या कवितेतून सांगत, तिचा आदर्श उभा केला आहे. शेतशिवारावर, विहिरीवर श्रावण महिन्यापासून पक्षांची किलबिलाट ऐकायला मिळते. या काळात सुगरण पक्षी विहिरीवर बांधलेल्या काटेरी झाडावरच्या खोप्यात दिसू लागतात. तयार झालेल्या घरट्यांमधून त्यांच्या पिल्लांचा आवाज येऊ लागतो. पक्षी प्रेमी, पर्यावरण प्रेमी तसेच छायाचित्रकार यांना या काळात त्यांची कारागिरी पहाण्याची पर्वणी असते. विहिरीवर, शेताच्या बांधावर एकेका झाडांवर पाच ते दहा खोपे लटकताना दिसतात.
सुगरणीच्या खोप्यात ऐकू येऊ लागला आहे चिवचिवाट
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या सुगरणीची घरटी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहेत. ही घरटी मोहक असतात. (Shirur News) त्याची कलाकुसर देखील सुबक असते. उत्तम कारागिरीचा नमुना असलेला खोपा नर सुगरण पक्षाकडून बांधला जातो. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे हिरवे गवत, हिरव्या पातीपासून तयार केलेली असतात. विशिष्ट आकार, रचना व कौशल्यपूर्ण विणकाम यामुळे सुगरणीचे घरटे अतिशय सुंदर असते.
मे महिन्यापासून ही घरटी बनविण्याचे काम सुगरण पक्षी करत असतो. सप्टेंबर व आक्टोंबर हा सुगरण पक्षांच्या विणीचा हंगाम असतो. नराने बांधलेल्या खोप्यात मादी अंडी उबवते. एकावेऴी एक नर चार ते दहा घरटी तयार करतो. (Shirur News) अपूर्ण बांधलेल्या घरट्यात मादी यावी म्हणून शिळ घालून मादीला आकर्षित करतो. मादी अगोदर घरट्याचे निरीक्षण करते. एखादे घरचे आवडले तरच ती नराला दाद म्हणून निवडत असते. सुगरण ही एकावेळी दोन ते चार अंडी घालते. नराने अपूर्ण बांधलेले घरटे दोघे मिळून पूर्ण करतात. त्यात ते पिलांना वाढवतात. त्यामुळे बहिणाबाई आपल्या कवितेत म्हणतात.
View this post on Instagram
पिल निजली खोप्यात, जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव, जीव झाडाले टांगला
श्रावणात पाऊस कमी झाला; पण नंतरच्या काळात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सगळीकडे हिरवेगार दिसू लागले आहे. वातावरणात झालेला बदल यातून मुबलक खाद्य व पाणी झाल्याने या पक्षांची लगबग वाढलेली पहावयास मिळत आहे. सुगरण हा पक्षी थव्याने राहत असल्याने विहिरीवर अडचणीच्या ठिकाणी उंच काटेरी झाडावर यांचे पाच ते दहा संख्येत घरटी पहावयास मिळतात. घरट्याच्या खालच्या बाजूने प्रवेशद्वार, खालून निमुळते, लांब बोगदा असलेले घरटे पिल्लांना संरक्षण मिळावे असे गोलाकार असते. (Shirur News) पट्टेरी, काळ्या छातीची व बया सुगरण अशा प्रजाती आढळतात. सध्या पुरेसे खाद्य व पाणी असल्याने सभोवताली सुगरणीच्या खोप्यात चिवचिवाट ऐकू येऊ लागला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : हॅाटेल व्यवसायातून मुलींना शिक्षणाचे बळ देणारी रणरागिणी…! रेखा भुजबळ
Shirur News : केंदूरच्या रघुनाथराव ढवळे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
Shirur News : टाकळी हाजी उपकेंद्र परिसरात महिनाभरात तब्बल १५ विद्युत रोहित्रांची चोरी