Shirur News : शिरूर : सर, आयुष्यात जे काही मिळालं ते तुम्ही केलेल्या ज्ञानार्जनामुळे, तुम्ही आमच्यावर केलेल्या संस्कारांमुळे आणि केवळ तुमच्या सहवासामुळे… याच पुण्याईवर पोलिसांत भरती झालो अन् नव्या आयुष्याला सुरवात केली. आजच पहिला पगार हाती आला. योगायोग म्हणजे आजच शिक्षकदिन आहे. गुरू-शिष्याचे नाते वृद्धिंगत करण्याचा आजचा दिवस मला संस्मरणीय करायचा आहे. माझा पहिला पगार मला तुमच्या चरणावर ठेवायची इच्छा आहे… असे म्हणत पगाराचे बंद पाकिट त्याने माझ्या हातावर ठेवले… अन् आज मी कृतार्थ झालो. शिक्षक दिनी घडलेला हा प्रसंग सांगताना कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील विद्याधाम विद्यालयातील प्राचार्य अनिल शिंदे यांच्या डोळ्यांत पाणी तरळले होते. शिंदे सरांना आनंदाश्रू लपवता येत नव्हते…
आजही शिक्षकावर श्रद्धा
शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई हे ग्रामदैवत श्री मेसाई देवीच्या नावाने प्रसिद्ध आहे. या भागात पाण्याचा दुष्काळ असल्याने बहुतेक तरुण नोकरी, उद्योगधंद्यांसाठी बाहेरगावी जातात. येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे ग्रामस्थांच्या मदतीने चांगली वाटचाल करत आहे. प्राचार्य शिंदे यांनी पदभार स्विकारल्यापासून येथील तरुणाईला एक नवी दिशा मिळाली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन शहाणे करतानाच त्यांना उद्योग-व्यवसाय, स्पर्धा परीक्षा याबाबत देखील मार्गदर्शन केले जाते. यासाठी त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने स्पर्धा परीक्षा वर्ग सुरू केला आहे. ते स्वतः या विद्यार्थ्यांकडे लक्ष देतात.
शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत पोलीस भरतीसाठी अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. पोलीस अधिकारी होऊन काही विद्यार्थी सध्या प्रशिक्षण घेत आहेत. यापुढेही येथे स्पर्धा परीक्षा वर्ग सुरू असल्याने, विद्यार्थी घडविण्याचे काम अविरत सुरू आहे. या शाळेत घडलेले माजी विद्यार्थी शाळेसाठी भरभरून मदत करत असतात. वेगवेगळ्या उपक्रमांतून शाळेला भरीव मदत मिळवून देण्याचे काम यामुळे होऊ लागले आहे. विद्यार्थ्यांच्या चांगल्या वर्तणुकीमुळे हे विद्यालय नावारूपाला आले आहे.
शिक्षकदिनी आलेला अनुभव शब्दबद्ध करताना प्राचार्य अनिल शिंदे म्हणाले की, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात असणारा माझा विद्यार्थी पोलीस अंमलदार अशोक मिडगुले याने पहिला पगार झाल्यानंतर ही बातमी प्रथम मला सांगितली. पहिल्या पगाराची रक्कम गुरुदक्षिणा म्हणून देण्याचा संकल्प त्याने केला. त्याने दिलेले पाकीट मी देव्हाऱ्यात ठेवले. अशा गुणवान विद्यार्थ्यांचा माझ्यावरील विश्वास आणि प्रेम पाहून मी भारावलो आहे.
आमच्या लायब्ररीत पहिले यश अशोकच्या रूपाने मिळाले, त्याचवेळी सर्व भरून पावलो. तो त्याच्या श्रद्धेचा विषय… पण श्रद्धेचे मोल पैशात नाही होऊ शकत. मात्र, एक कळलं की आजही शिक्षकावर श्रद्धा असणारे गुणवंत विद्यार्थी आहेत… शिक्षकदिनी या विद्यार्थ्यांनाच माझा सलाम!!