युनूस तांबोळी
Shirur News : ‘स्त्री’ हे दुर्गेचे रुप आहे. आपल्यासह कुटूंबावर येणाऱ्या संकटावेळी ती खंबीरपणे उभी राहते. ती सबला असल्याने शक्तीचे प्रतिक आहे. त्यामुळे कुटूंब व समाजातील संकटांना सामोरे जाताना ती स्वतःला झोकून देते. अपार कष्ट करून ती मुलांना शिक्षण देऊन समाजात लढण्याचे बळ देते. मलठण (ता. शिरूर) येथील रेखा भुजबळ या रणरागिणीने समाज काय म्हणेल, याची पर्वा न करता, हॅाटेल व्यवसायातून तीन मुलींना शिक्षण देऊन, घडवले आहे. समस्यांना सामोरे जाण्याचे बळ त्यांच्यामध्ये निर्माण केले आहे.
हॅाटेल व्यवसायातून मुलींना शिक्षण देऊन घडवले
सुखी संसाराचे स्वप्न पाहत पतीबरोबर संसार सुरू केला. काही काळ खडतर परिस्थितीला सामोरे जात, सुख-दुःखाचे हेलकावे खात गेला. शेती व्यवसाय करून पतीच्या खांद्याला खांदा लावून कष्ट केले. त्यांच्या संसारवेलीवर तीन गोंडस कन्यारूपी फुले बहरली. (Shirur News) मुलींचा जन्म झाल्यामुळे अनेकांनी तिला दूषणे दिली. अनेक वेळा कुटूंबात कलहाला ती सामोरी गेली. काही काळानंतर पतीनेही सोडून दिले. अशा वेळी पदरात तीन मुली आणि पुढचं आयुष्य कसं जगायचा, असा प्रश्न आ वासून उभा होता. सुखी संसाराचे स्वप्न पाहिलेल्या तिच्या त्याच डोळ्यांमध्ये अश्रुधारा दिसणार याची पुसटशी कल्पना देखील नव्हती. मात्र, आलेल्या संकटाला धीराने सामोरे जाण्याचे बळ मात्र तिच्यात होते.
चरितार्थासाठी रेखाताईने रस्त्याच्या कडेच्या जागेमध्ये पत्र्याची शेड टाकून लहानसा हॅाटेल व्यवसाय सुरू केला. जमेल तसे आणि जवळ असणाऱ्या भांडवलावर ‘स्नेहल’ हे हॅाटेल उफे राहिले. व्यवसाय म्हटला की अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण त्यातून देखील तिने मार्गक्रमण केले. कोरोना काळात देखील व्यवसाय बंदीचा तोटा तिला सहन करावा लागला. पण या काळात देखील ती धिराने संकटाला सामोरी गेली. (Shirur News) या लहानशा व्यवसायाने तिला चांगली साथ दिली. नातेवाईकांच्या मदतीने तिच्या कष्टांना बळ निर्माण झाले. कितीही कष्ट करावे लागले तरी मुलींना शिक्षण द्यायचे, हा तिचा निर्धार होता. त्यातून तीनही मुलींनी शिक्षणाला महत्त्व दिले.
मोठी मुलगी वर्षा हिने ‘जेएनएम’ नर्सींगचे शिक्षण घेतले आहे. त्यातून तिला पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात नोकरी मिळाली आहे. वर्षाच्या या नोकरीमुळे रेखा यांना पाठबळ मिळत आहे. दुसरी मुलगी मेघा हिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. (Shirur News) सध्या ती नोकरीच्या शोधात आहे. आईच्या हाताखाली हॅाटेल व्यवसायाला मेघाचे मोठे सहकार्य आहे. कष्ट करून शिकण्याची तिची जिद्द महत्त्वाची आहे. तिसरी लहान मुलगी अकरावी शास्त्र शाखेत शिक्षण घेत आहे. या तीनही मुली हुशार असल्याने आईच्या कष्टांना बहर येणार आहे.
जीवनात मी कधीही हार मानली नाही. शिक्षण देऊन शहाण करण्याचा माझा मानस माझ्या मुलींनी सत्यात उतरवला. आजही हॅाटेल व्यवसाय करून मी मुलींना बळ देत आहे. (Shirur News) त्यांना नोकरी मिळाली की माझी संसाराची नौका पार झाली असे मी समजेन. महिलांनी न डगमगता, कष्ट करून कोणतेही ध्येय गाठण्याचा प्रयत्न केल्यास त्या यशस्वी होऊ शकतात.
रेखा भुजबळ, हॅाटेल व्यवसायिक
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : केंदूरच्या रघुनाथराव ढवळे विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
Shirur News : टाकळी हाजी उपकेंद्र परिसरात महिनाभरात तब्बल १५ विद्युत रोहित्रांची चोरी
Shirur News : घरासमोर झोपलेल्या ज्येष्ठावर बिबट्याचा हल्ला; जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील घटना