अमिन मुलाणी
Shirur News : सविंदणे : शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागात बेल्हे, जेजूरी व अष्टविनायक महामार्ग सुरू झाल्यामुळे प्रवासी वाहतूक वाढली असून, अवैध धंद्यांना ऊत आला आहे. माजी गृहमंत्री व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदासंघात टाकळी हाजी, कवठे येमाई जिल्हा परिषद गटात राजरोसपणे धाबे, हातभट्टयांची किरकोळ दारूविक्री होत आहे. याबाबत पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात घोड नदी, कुकडी नदी व डिंभा उजव्या कालव्याच्या पाणी व्यवस्थापनामुळे शेती सुजलाम् सुफलाम् झाली. शेतीमुळे आर्थिक उत्पन्नात वाढ झाल्यामुळे बेट भाग हा आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला. दूर्दैव म्हणजे समृद्धी आली त्यापाठोपाठ कुटुंबातील कर्त्या पुरूषांची व्यसनाधिनता वाढीस लागली. दारूच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
कवठे येमाई, मलठण, जांबूत, पिंपरखेड, टाकळी हाजी ही मोठी गावे आहेत. प्रत्येक मोठ्या गावांत पाच ते सात, तर लहान गावांत दोन ते तीन किरकोळ हातभट्टी विक्रीची अनधिकृत दुकाने चोरून थाटली आहेत. (Shirur News) टाकळी हाजी चौकीअंतर्गत पश्चिम भागात ७० ते ८० लोक अवैध दारूची विक्री करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
टाकळी हाजी, कवठे येमाई, सविंदणे परिसरात नदीच्या कडेला काटेरी झुडपात सुमारे १० ते १५ ठिकाणी दारू काढण्याचे काम रात्री सुरू असते. मागील महिन्यात शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोठी कारवाई केली. मात्र, स्थानिक खाकीच्या कृपेने हे धंदे पुन्हा सुरू झाले आहेत. या परिसरातून अनेक गावांना दिवसाढवळ्या टाकळी हाजी पोलीस चौकीसमोरून दारूची वाहतूक केली जात आहे. (Shirur News) टाकळी हाजी, जांबूत, पिंपरखेड, कवठे येमाई, आमदाबाद फाटा, चिंचोली, मलठण, सविंदणे परिसरात धाब्यांवर सर्रास दारूची विक्री सुरू आहे. शिरूर तालुक्याच्या सिमेवर आंबेगाव तालुक्यातील गावांमध्ये देखील अवैध दारू विक्री सुरू आहे. या भागात चिरमिरी घेऊन सर्रास दारू विक्री होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
अवैध व्यवसायामुळे गुन्हेगारी वाढली
शालेय मुला-मुलींना रस्त्याने जाताना या मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे. जांबूत परिसरात घडलेल्या खंडणी, अपहरणाचे वारंवार घडत असलेले गुन्हे याचे उगमस्थान हे अवैध धंदेच आहेत. त्यामुळे परिसरात अनेकांचे खून झाले आहेत. गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. या भागात मोठी कमाई मिळत असल्याने अनेक पोलीस अधिकारी या भागात बदली करून घेण्यासाठी प्रयत्न करीत असतात. (Shirur News) अनेक वर्षे चौकीला असलेले पोलीस व अधिकारी यांची बदली करण्याची मागणी जनतेमधून दबक्या आवाजात केली जात आहे. शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी तसेच शिरूरचे नवीन पोलीस निरीक्षक संजय जगताप हे सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघाला अवैध धंद्याची लागलेली कीड मुळासकट काढणार का, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : श्रावणी व भाद्रपदी बैलपोळ्याला पुरणपोळीचा घास महागला; हरभरा व साखरेच्या दरांत मोठी वाढ
Shirur News : पाणी नाही, तर मतदान नाही…! कान्हूर मेसाई येथे पाणी परिषदेत ठराव