योगेश पडवळ
Shirur News : पाबळ : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील १२ गावे आजही तहानलेली आहेत. पुढाऱ्यांच्या पुढाकारानंतरही ही १२ गावे दुष्काळग्रस्त ठरली असून, ‘पाणी नाही तर मतदान नाही’… अशी तीव्र भावना कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे झालेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आली.
शिरूरच्या पश्चिम भागातील १२ गावे अद्याप तहानलेलीच…!
कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त असणाऱ्या १२ गावांची आढावा बैठक रविवारी (ता. १०) श्री मेसाई देवी मंदिरात झाली. देवीची खणा-नारळाने ओटी भरून या बैठकीला सुरूवात झाली. शिरूर तालुक्यातील पठारावर असणारा भाग म्हणजे पाबळ, केंदूर, कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी, धामारी, डफळापूर, खैरेनगर, वरूडे, चिंचोली मोराची, खैरेवाडी, शास्ताबाद या भागात कायमस्वरूपी दुष्काळ असतो. (Shirur News) उन्हाळ्यात या भागात नेहमी दुष्काळाचे सावट असून, चारा छावणी उभारण्याचे काम केले जाते. दुष्काळ असल्यामुळे शासनाने या भागात जलसंधारणाची कामे केली आहेत. मात्र, पाऊसच नसल्याने पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
या ठिकाणी बहुतेकवेळा पिण्यासाठी पाण्याचा टॅंकर सुरू करण्यात येतो. यासाठी भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून येथे टाक्या देखील पुरविण्यात आल्या आहेत. (Shirur News) कान्हूर मेसाई येथे या भागात नाम संस्थेच्या माध्यमातून खोलीकरण व तलावांची कामे करण्यात आली आहेत. यासाठी येथील तरूण वर्गाने पुढाकार घेतला आहे. पाऊस नसल्याने शेती व्यवसायाबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतानाच, तरुण वर्गाला नोकरी-व्यवसायासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याची वस्तूस्थिती आहे.
दरम्यान, वेगवेगळ्या माध्यमांतून येथे पाणी आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, या भागात शाश्वत पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या गावांच्या विरूद्ध दिशेला डिंभा उजवा कालवा जात असल्याने या भागात विविध पीके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र या १२ दुष्काळग्रस्त गावांकडे कोणी लक्ष देत नसल्याने, या भागातील १२ गावांचा पाणीप्रश्न पेटला आहे. आता नाही तर परत कधीच नाही… शाश्वत पाण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असे म्हणत कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे पाणी परिषद घेण्यात आली. यासाठी या भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात ही १२ दुष्काळी गावे आहेत. येथे वर्षानुवर्षे पाऊस नसल्यामुळे जिरायत शेती करावी लागते. सध्या दुष्काळाचे महासंकट उभे राहिले असून, जनावरे देखील कवडीमोल भावाने विक्री करावी लागत आहेत. डिंभा धरणाचे पाणी या भागात आणायचे असेल तर १२ गावांनी ग्रामसभा घ्यावी. (Shirur News) कुणी ऐकले नाही तर मतदान करू नका. आपण सगळे पाण्यासाठी आंदोलन करू. पाणी नाही तर मतदान नाही, असा ठराव ग्रामसेभत करून घ्या. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाणी प्रश्नासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे माजी सरपंच दादा खर्डे यांनी सांगितले.
या वेळी परिसरातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. या भागातील १२ गावांत दुष्काळाचा प्रश्न गंभीर असून, यासाठी पुन्हा एकत्रित येऊन बैठक घेण्याचे ठरले. त्यातून पाणी प्रश्नासाठी आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.
पाणी नाही तर मतदान नाही…
राजकीय नेते निवडणुकीपुरती त्यांची पोळी भाजून घेतात. त्यानंतर केलेल्या उपोषण, मोर्चाला पाठिंबा देत नाहीत. या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने पुढाकार घेऊन या १२ गावांत ग्रामसभा घ्यावी. त्यातून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव घ्यावा. (Shirur News) लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना हा ठराव पाठविण्यात येईल. आता नाही तर कधीच नाही, या शब्दांत दुष्काळाबाबत तीव्र प्रतिक्रिया या पाणी परिषदेत उमटल्या होत्या. लोकशाही मार्गाने आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, अशी चर्चा या पाणी परिषदेत झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : आंतरशालेय क्रिडा स्पर्धेत श्रीतेज बोऱ्हाडे, वैष्णव इचके यांचे यश
Shirur News : बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी तरुणाची मंगलदास बांदल यांनी घेतली भेट; धाडसाचे कौतुक