Shirur News : शिरूर : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील हिलाळ वस्ती येथे शेतीला पाणी देत असताना अचानक बिबट्याने एका तरूणावर हल्ला केला. यामध्ये परमेश्वर दत्तात्रय बोटकर (वय २१) हा तरुण जखमी झाला असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.
शिरूर तालुक्यातील बेट भागात बिबट्याचे पशुधनाबरोबर मानवी वस्तीवर हल्ले वाढले आहेत. नुकतीच म्हसे बु. येथील महिलेवर हल्ला झाल्याची घटना ताजी असताना आता ही घटना घडली आहे. शासनाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या बिबट्याच्या हल्ल्याने शाळकरी मुले, महिला व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भीतीचे वातावरण पसरले
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर दत्तात्रय बोटकर हा तरुण मंगळवारी (दि.६) संध्याकाळी सहाच्या वाजताच्या सुमारास आपल्या शेतीला पाणी देत होता. यावेळी अचानक बिबट्याने पाठीमागून त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये बिबट्याने परमेश्वरच्या छातीवर पंजा मारला व डाव्या पायाला जबड्यात पकडल्यामुळे दातांचा त्याला दंश झाला. परंतु, त्याने न घाबरता बिबट्याबरोबर झटापट केली. तसेच त्याचा धिरोदत्तपणे सामना केला. त्याने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने शेजारील ऊसात पोबारा केला.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या आदेशाने वनपाल गणेश पवार, वनरक्षक नारायण राठोड तसेच वन कर्मचारी हनुमंत कारकुड यांनी घटनास्थळी भेट दिली व सविस्तर अहवाल आपल्या वरिष्ठांना सादर केला. यावेळी त्यांनी तरुणाची उपचार संबंधित माहिती घेतली. तसेच पुढील उपचाराची व्यवस्था केली. कवठे येमाईचे उपसरपंच उत्तम जाधव, युवा नेते अविनाश पोकळे, अतुल हिलाळ, सावकार शेटे यांनी भेट देऊन दिलासा दिला. तसेच तरुणाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.
बिबट्यापासून सावधगिरी बाळगावी
या परिसरात उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे बिबट्यांना नैसर्गिक अधिवास मिळाला आहे. जनतेने बिबट्यापासून सावध राहण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. शेतीला पाणी देण्यासाठी एकट्याने जाऊ नये. सोबत मोबाईल किंवा रेडिओ नेऊन त्याच्यावर मोठ्या आवाजात गाणे लावले पाहिजे. सोबत काठी असावी तसेच बिबट्या त्या क्षेत्रात असेल तर पाणी भरण्या अगोदर फटाके वाजवले पाहिजे.
– नारायण राठोड, वनरक्षक
शासनाने बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा
कवठे परिसरात बिबट्यांचा वावर अतिशय धोकादायक झाला आहे. बिबट्याने पशुधनावर हल्ले वाढलेले आहेत. परंतु, आता त्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविलेला दिसतो. शासनाने बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा या परिसरातील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण होणार आहे. यापुढील काळात कोणाच्या जीवितास धोका झाल्यास त्यास सर्वस्वी वनखाते जबाबदार राहणार आहे. लवकरच यासंबंधी मी वन खात्यातील वरिष्ठांशी बोलणार आहे.
– डॉ. सुभाष पोकळे, माजी पंचायत समिती सदस्य
जखमी तरुणाला सर्वतोपरी मदत करणार
तरुणाच्या धाडसाचे कौतुक करावे तितके थोडे आहे. त्याने न डगमगता बिबट्याचा सामना केला. ग्रामपंचायत प्रशासनाकडून या जखमी तरुणाला सर्वतोपरी मदत करण्यात येईल. शासनाने सुद्धा नुकसान भरपाई म्हणून जास्तीत जास्त रक्कम या तरुणाला दिली पाहिजे.
– सुनीता बबनराव पोकळे, सरपंच
पिंजरे वाढवण्याची मागणी करणार
या घटनेची आम्ही सविस्तर माहिती घेतली असून, यासंबंधी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलून या भागात पिंजरे वाढवून व लोकजागृती करण्यास वन खात्याला सांगण्यात येणार आहे. तसेच या तरुणाला चांगले उपचार मिळाले पाहिजेत.
– दीपक रत्नपारखी, माजी सरपंच