युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : दरवर्षी श्रावण अमावस्येदिवशी बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. या सणादिवशी बळीराजा बैलांना सजवून त्यांची मिरवणूक काढतो आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. यंदा ऐन सणासुदीच्या दिवसांत पुरणपोळीसाठी लागणारी हरभरा डाळ व गूळ, साखरेच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुरण पोळीचा घास ‘कडू’ लागणार आहे.
कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी बैल पोळ्याचे महत्व अजूनही कायम आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्यांच्याकडे शेती नाही, ते मातीच्या बैलाची पूजा करतात. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतण देण्यात येते. (Shirur News) ओढा वा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात. शेतकऱ्यांच्या दृष्टीने बैल पोळ्याला विशेष महत्व आहे. बैल वर्षभर शेतात राबतात. शेतकऱ्यांना बैलांची साथ असते. म्हणून बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते. बैल हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. बैलपोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे. पुणे व नगर जिल्ह्यात बैलांना सजवून त्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढली जाते.
दरम्यान, शेतीसाठी वापरात येणारा बैल सध्या यांत्रिकीकरणामुळे गोठ्यात दिसून येत नाही. मात्र, बैलगाडा शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणात बैलांना मागणी वाढल्यानंतर पुन्हा गोठ्यात बैलांची जोडी दिसू लागली आहे. त्यातून बैलगाडा शर्यतींचे घाट फुलताना दिसत आहेत. (Shirur News) या बैलांना लाखो रूपये किंमत मोजावी लागत असल्याने बैलांना देखील मागणी वाढल्याचे दिसून येते. बैलपोळ्याला या बैलांची मिरवणूक काढली जाते.
यंदा सणाच्या तोंडावर हरभरा डाळ व साखरेचे भाव वाढल्याचे दिसून येत आहे. यंदा हरभरा डाळ प्रतिकिलो १५ ते २० रूपयांनी महागली आहे. पंधरा दिवसांपूर्वी ७० ते ७५ रूपये प्रतिकिलो असणारी हरभरा डाळ आता ८२ ते ९० रूपये किलो झाली आहे. परिणामी पुरणपोळी खाणाऱ्यांना महागाईला सामोरे जावे लागणार आहे. तर साखरेच्या दरात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात साखरचे दर ४८ रूपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहेत.
साखर उत्पादनात महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांचा प्रथम क्रमांक लागतो. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होणार आहे. जूनमध्ये किरकोळ बाजारात ४२ रूपये प्रतिकिलो होता. आॅगस्टमध्ये हे दर ४४ रूपयांवर गेले होते. सप्टेंबर महिन्यात तेच दर ४८ रूपयांवर गेल्याने दीड महिन्यांत या दरात ४ रूपयांनी वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्गात वर्तविली जात आहे.
ऊसाच्या उत्पादनाचा साखर उत्पादनावर परिणाम
हरभरा डाळीची आवक होण्यासाठी अजून नऊ महिन्यांचा कालावधी आहे. हरभरा डाळीची मागणी वाढल्याने भाव वाढले आहेत. बाजारात हरभरा डाळ क्विंटलमागे ६०० ते ८०० रूपयांनी वाढ झाली आहे. साखरेचे भाव देखील वाढले आहेत. पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऊसाच्या उत्पादनाचा परिणाम साखर उत्पादनावर होणार आहे, अशी प्रतिक्रीया किराणा दुकानदार एकनाथ सांडभोर यांनी व्यक्त केली.
शिरूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश रत्नपारखी म्हणाले की, ग्राहकांना स्वस्त हरभरा डाळ देण्यासाठी केंद्राने पाऊल उचलले आहे. (Shirur News) मात्र, ती डाळ मिळाली नसल्याने वाढलेल्या किमतीत हरभरा डाळ खरेदी करावी लागत आहे. राज्य शासनाकडून साखर, हरभरा डाळ, तेल, रवा या चार वस्तू १०० रूपयांत स्वस्त धान्य दुकानामार्फत उपलब्ध होणार आहेत. गणेशोत्सवानिमित्त या वस्तू दिल्या जाणार आहेत. उपलब्ध झाल्यास स्वस्त धान्य दुकानात वाटप सुरू करण्यात येईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : पाणी नाही, तर मतदान नाही…! कान्हूर मेसाई येथे पाणी परिषदेत ठराव