शुभम वाकचौरे
जांबूत, (पुणे) : शिरूर तालुक्यातील फाकटे, वडनेर खुर्द, चांडोह या गावांमधील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागावा. यासाठी सामाजिक कार्यकर्ते नितीन पिंगळे, ग्रामपंचायत सदस्य पवन वाळुंज, माजी उपसरपंच मनीष बोऱ्हाडे यांनी गावात उपोषण सुरू केले होते. या रस्त्यांची दुरावस्था झाल्याने याकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. रस्त्यांवर निधी टाकून डांबरीकरण व्हावे. अन्यथा जलसमाधी घेणार असा इशाराही देण्यात आलेला होता.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांच्या मध्यस्थीने या भागातील रस्त्यांवर विकास निधी टाकण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, पंचायत समिती माजी सदस्य डॉ. सुभाष पोकळे, सरपंच अरुणा घोडे, बिपिन थिटे, माऊली ढोमे ग्रामस्थ, संघटना व पदाधिकारी उपस्थित होते.
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपोषणकर्त्या बरोबर या भागातील विकास कामांची रविवारी (ता. २४) बैठक बोलवली असल्याने या रस्त्यांवर विकास निधी कोणाचा पडणार याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु झाल्या आहेत. फाकटे, वडनेर खुर्द आणि चांडोह या भागात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे.
अनेक दिवसांपासून रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व डांबरीकरणासाठी या भागातील नागरिक आग्रह करत आहे. मात्र राजकिय द्वेषातून या भागात विकास निधी टाकला जात नव्हता. त्यामुळे या भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली होती. काही ठिकाणी खड्डे पडून त्यामध्ये पाणी साठले होते.
शिक्षण, शेतमाल व प्रवासी वाहतूकीला मुख्य रस्ते अडचणीचे ठरले होते. अनेक वेळा पाठपुरावा करून ही विकास कामांबाबत कोणताच निर्णय होत नव्हता. या रस्त्याचा मुख्य प्रश्न सुटत नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या रस्त्याबाबत विकास कामे झाली नाही तर जलसमाधी घेणार असल्याचा इशाराही येथील तरूणांनी दिला होता. रस्त्यांची दुरावस्था व विकास निधी यासाठी हे तीन दिवस हे उपोषण सुरू होते.
दरम्यान ग्रामस्थ व उपोषणकर्ते यांच्यासमवेत रविवारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीत विकास कामांबद्दल सर्व निर्णय घेतले जाणार आहे. असे उपोषणकर्ता नितीन पिंगळे यांनी सांगितले.