युनूस तांबोळी
Shirur News | पुणे : शिरूर ( Shirur ), आंबेगाव, जुन्नर व खेड या परिसरात बिबट्यांनी चांगलाच धूमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीज पूरवठा करण्याचे आदेश शासनाने दिले. त्याप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्रात अखंड विजपुरवठा शासनाने द्यावा. बिबट प्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या दूर कराव्या. अशी मागणी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केली आहे.
जिल्ह्यात आंबेगाव, जुन्नर, शिरूर व खेड यातील बहुतांशी भाग डोंगराळ व गर्दी झाडीचा असल्याचे दिसून येते. पाणी व्यवस्थापनासाठी डिंभा, माणिकडोह, पिंपळगाव जोगा, वडज, येडगाव, चिल्लवाडी, चासकमान ही धरणे या ठिकाणी महत्वाची ठरू लागली आहे. त्यामुळे घोड व कुकडी प्रकल्प कार्यान्वयीत झाला आहे. त्यामुळे ९० टक्के बागायत क्षेत्रात वाढ झाली आहे.
यातून ऊस, द्राक्षे, केळी, डाळींब, आंबा या सारख्या बागा उभ्या राहिल्या आहेत. उसासारख्या क्षेत्रात वर्षभर लपण्यासाठी बिबट्याला वात्सव करून राहण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बिबट्याचे मोठ्या प्रमाणात प्रजनन होऊन त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसू लागली आहे.
मेंढपाळ व्यवसायीक बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नुकसानीचे बळी…
सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या वाढली असल्याचे वनविभागाच्या निर्दशनास आले आहे. त्यातून पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले वाढले आहे. यामुळे शेतकरी व मेंढपाळ व्यवसायीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिरूर व आंबेगाव परिसरात मानव वस्तीवर हल्ला करणारे बिबटे नरभक्षक झाल्याचे दिसून आले आहे.
अनेक प्रवासी व शेतकऱ्यांवर बिबट्याचे हल्ले झाले. त्यातून बालक, तरूण व जेष्टांना देखील आपले प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे या परिसरात अंखड विजपूरवठा करण्यात यावा. यातून कृषी पंपाना विज मिळवून शेतकरी आपल्या समस्यांतून मुक्त होईल. बिबट संघर्ष व त्यातून उपाययोजना होण्यासाठी शासनाने विधानसभा सदस्यांची समिती गठीत केली आहे.
या समितीचे समन्वयक म्हणून अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव ) पश्चिम अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. या समितीत समीर कुणावार, संडय कुटे, आशिष जयस्वाल, अशोक उईके, कृष्णा गजबे, प्रतिभा घानोरकर, मदन योरावार, अनिल बाबर, प्रकाश आंबेडकर, जयंत पाटिल, दिलिप वळसे पाटील, अशोक पवार, अतुल बेनके, मानसिंग नाईक, सुनील प्रभू आदी आमदारांची या समितीवर नेमणुक केली आहे. या समितीमुळे पुणे जिल्ह्यातील बिबट प्रवण क्षेत्रात बिबट्यांच्या हल्ले रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जाऊ शकतात.
शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ऊस तोड रखडल्याने शेतीची मशागत व इतर कामे रखडत होती. विज पंपाना रात्रीचा विज पुरवठा होत असल्याने बिबट्यांचे हल्ल्यांच्या घटना घडत होत्या. मेंढपाळ व्यवसायीकांना बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नुकसानीला सामोरे जावे लागत होते. शेतकरी, कष्टकरी, प्रवासी व सामान्य जनतेला बिबट ही मोठी समस्या उभी राहिली होती. राज्याचे माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या माध्यमातून या समस्या सोडविण्याचे काम होईल.
– मानसिंग पाचुंदकर
अध्यक्ष – शिरूर, आंबेगाव, विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी