शिरुर : हात उसने दिलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून एकाच्या पोटात चाकू खुपसून खून केला होता. तर मध्यस्थी करून भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या शिरूरच्या नगरसेवकावरही चाकू हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हे आदेश शिवाजीनगर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी शनिवारी (ता.३०) दिले.
अमर रघुवीर बैसे (वय 38, रामलिंग रोड पाबळ फाटा, ता. शिरूर, जि. पुणे) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर प्रशांत लक्ष्मण माळवे (वय ३८ रा. हुडको कॉलनी, शिरूर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन गुलाब धाडीवाल (वय ३८, रा. काचे आळी, शिरूर) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार शिरूर येथील डंबेनाला येथे २२ मार्च २०१८ रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन धाडीवाल हे नगरसेवक होते. तसेच ते किराणा मालाचे दुकानदार आहेत. धाडीवाल व प्रशांत माळवे हे दोघे एकमेकांचे ओळखीचे होते. प्रशांत माळवे याने आरोपी अमर बैसे याला हात उसने स्वरुपात १० हजार रुपये धाडीवाल यांच्यासमक्ष दिले होते. दरम्यान, माळवे याने आरोपी अमर बैसे हा पैसे देत नाही. त्याला तुम्ही येऊन पैसे द्यायला सांगा, असे माळवे यांनी धाडीवाल यांना सांगितले. त्यानंतर धाडीवाल हे तेथे गेले असता, आरोपी अमर बैसे याने तुला संपवूनच टाकतो, असे म्हणत प्रशांत माळवे याच्यावर चाकूहल्ला केला. धाडीवाल सोडवण्यस गेले असता आरोपी अमरने त्यांच्यावरही हल्ला केला.
आरोपी अमर घटनास्थळावरून पसार झाला. धाडीवाल यांना शिरूर येथील चोरे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर प्रशांत माळवे याला उपचारासाठी शिरूर येथील माणीकचंद हॉस्पिटल दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी प्रशांत माळवे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
याप्रकरणी सचिन धाडीवाल यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी अमर बैसे याला अटक केली होती.
सदर खुनाच्या गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात अति. सरकारी अभियोक्ता प्रेमकुमार अगरवाल यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी अमर यास भारतीय दंड विधायक कलम 302 अन्वये जन्मठेप व 500 रुपये दंड व भारतीय दंड विधायक कलम 307 अन्वये १० वर्षे शिक्षा व 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश शिवाजीनगर सेशन कोर्टाचे न्यायाधीश आर. एन, हिवसे यांनी शनिवारी (ता.३०) दिले आहेत.
या खटल्यात सरकली वकील प्रेमकुमार अगरवाल यांना शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत तपासी अंमलदार किरण घोंगडे, पोलीस अंमलदार सुरेश रणसुर व महिला पोलीस रेणुका भिसे यांची मदत मिळाली.