अमिन मुलाणी
Shirur News : सविंदणे : गणपती बाप्पा मोरया.. , ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘एक…दोन.. तीन.. चार…गणपतीचा जयजयकार’, ‘मोरया रे बाप्पा मोरया रे..’ अशा एक ना अनेक घोषणांनी वातावरण भारुन टाकत, गणेशभक्तांच्या अभूतपूर्व उत्साहात विघ्नहर्ता मानल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांची मंगळवारी (ता.१९) शिरूर तालुक्यात मोठ्या भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आज पावसाची रिमझिम अंगावर झेलत शिरूर करांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या उत्साहात घरी नेले.
मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव
दरवर्षी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिरूरकरांचा उत्साह कमालीचा असतो. बच्चेकंपनी मोठ्या संख्येने गणपतीची मूर्ती खरेदी करताना दिसून आली. ढोल-ताशांच्या गजरात गणपतींचे घरोघरी आगमन झाले. त्यानंतर आराध्य देवतेची घरोघरी मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. जिल्ह्यात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदीवर गणेशभक्तांचा भर असल्याचे दिसून आले.
महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होता. महाराष्ट्रात हा उत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. गणेशोत्सव काळात गणेश दर्शनासाठी लाखोंची गर्दी होते. शिरूर शहरासह ग्रामीण भागांमध्ये गणरायाला घरी आणण्यासाठी अबलवृद्धांची आज लगबग पाहायला मिळाली.