पुणे: शिरूर लोकसभा मतदारसंघात आज (सोमवार, दि. १३ मे) मतदाराने स्वतः मतदान करताना छायाचित्रीकरण करून समाज माध्यमांवर प्रसारीत केल्याची घटना समोर आली. यासंदर्भात मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी चौकशी करून संबंधित मतदारावर खेड पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण भागात याचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर असल्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी चौथ्या टप्प्यातील पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी मोबाइल सोबत नेण्यास मनाई केली होती.
राजगुरूनर (ता. खेड) हुतात्मा राजगुरू विद्यालय राजगुरूनगर, मतदान केंद्र के १४१ केंद्रावर शेखर घुमटकर (वय ३८) या तरुण मतदाराने स्वतः मतदान करताना चित्रीकरण करून समाजमाध्यमांवर प्रसारीत केले. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चौकशी करून संबंधित मतदाराला ताब्यात घेऊन आदेशाचा भंग केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मतदारावर गुन्हा दाखल केल्याची माहिती मोरे यांनी दिली.