युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अद्याप कोणत्याही पक्षाचे तिकीट मला मिळालेले नाही. तिकीट वाटपाचा निर्णय अजून होणार आहे. याबाबत काय चर्चा आहे, मला माहिती नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. परंतु जनतेने मला तीन वेळा निवडून संसदेत पाठवले आहे. त्यामुळे खरा खासदारकीचा दावेदार मीच आहे, असे स्पष्ट मत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या खासदारकीच्या तिकिटाबाबत जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या २०२४ च्या निवडणुकीबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे. शिरूरची जागा ही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला गेल्याची चर्चा आहे. हे समजताच खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शिरूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती. त्यावेळी ते बोलत होते.
आढळराव पाटील म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडल्यानंतर अनेक विकासकामे मार्गी लावत असताना मुख्यमंत्र्यांनी खूप मोठी ताकद माझ्या मतदारसंघात विकासकामांच्या माध्यमातून उभी केली. गेली अनेक वर्षे जनतेमध्ये राहून काम केले आहे. आजही न थकता, न थांबता मी मतदारसंघात लोकांची कामे करत आहे. कोणत्याही इतर पक्षाचे तिकीट मला जाहीर झालेले नसतानाही अनेक माध्यमांतून मला अजित पवार गटाकडून किंवा इतर पक्षातून आढळराव पाटील हे निवडणूक लढविणार असल्याची लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
आढळराव म्हणाले की, आज मी पुन्हा याठिकाणी सर्व कार्यकर्त्यांसमोर जाहीर करतो की, मला आजपर्यंत कोणत्याही पक्षाचे तिकीट जाहीर झालेले नाही. निवडणूक समोर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचाराने जो काही निर्णय होईल तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यास तो मला मान्य असेल. मोदींना पाठिंबा देण्यासाठीच हे सर्व नेते आज प्रयत्न करत आहेत. तिकीट वाटपाचा निर्णय अजून व्हायचा आहे. काय चर्चा आहे, माहिती नाही. ही जागा आपल्यालाच म्हणजे एकनाथ शिंदे गटाला मिळेल, असेही नाही. राजकारणात काहीही होऊ शकते. येत्या पाच ते सहा दिवसांत हा निर्णय होईल, त्यानंतरच योग्य दिशा ठरवून तुमच्या तिकिटाचे फायनल होईल असे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे. परंतु खासदारकीचा दावेदार शिरूर लोकसभा मतदारसंघात मीच आहे, असेही खासदार आढळराव पाटील यांनी सांगितले.