पुणे : मागील अनेक वर्षांपासून फक्त कागदावरच असलेल्या शिरूर-खेड-कर्जत या मार्गासाठी आता शासन दरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यतः पुणे-अहिल्यानगर (अहमदनगर) रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात शासनाकडून या प्रकल्पाला मान्यता मिळणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. शिरूर खेड-कर्जत असा नवीन मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केला आहे. या मार्गामुळे मराठवाडा येथून मुंबईकडे जाणारी वाहतूक शिरूर-खेड मार्गे थेट कर्जत-मुंबईला जाण्यासाठी आणखी एक महामार्ग तयार होणार आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे देशांतर्गत सर्व प्रमुख कॉरिडॉर हे मुंबईशी जोडलेले असणे, ही प्राथमिक गरज आहे. मराठवाड्याचा मोठा भाग आणि अहिल्यानगर या क्षेत्रातील मुंबईला जाणारी वाहतूक मुख्यतः पुणे मार्गे जाते. या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीचा थेट परिणाम पुणे-शिरूर या रस्त्याच्या भागातील वाहतूक कोंडीत होतो. नगर रस्त्यावरील ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध पर्यायांचा विचार करण्यात आला होता. त्यानुसार शिरूर मार्गे थेट कर्जत जाणाऱ्या रस्त्याचा एक पर्याय समोर आला. मल्टिनोडल कॉरिडॉर म्हणून हा मार्ग ओळखला जाणार असून हा मार्ग चारपदरी असणार आहे. सद्यस्थितीत मराठवाडामधून येणाऱ्या वाहनांना मुंबईला जाण्यासाठी चाकण-शिक्रापूर-तळेगाव या मार्गे मुंबईला जावे लागत आहे.
चाकण आणि शिरूर येथील एमआयडीसीमुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी सध्या एकच मार्ग अस्तित्वात आहे. त्यामुळे हा नवीन मार्ग पुढे आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुणे येथे या प्रकल्पाचा सविस्तर आढावा नुकताच घेतला, भोसले यांनी या प्रकल्पासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकल्पाचे पुढील आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. यास मान्यता घेणार असल्याचा विश्वास शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.